लातूर : जिल्ह्यात एका कुख्यात गुन्हेगाराला पोलिसी खाक्या दाखवून महिला पोलिसांनी रस्त्यावरून धिंड कडून पोलीस ठाण्यात नेल्याची घटना घडली आहे. या गुंडाचा पोलिसांनी (लातूर पोलीस) बंदोबस्त केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.
महिला पोलिसांचा रुद्रावतार यावेळी लातूरमध्ये पाहायला मिळाला. पोलिसांचे खरे कर्तव्य आणि कायद्याचा धाक दाखवत गुंडाला मिरवत पोलिस ठाण्यात (पोलीस स्टेशन, लातूर) नेले. ज्या भागात तो लाखोंची कमाई करत होता त्याच भागात हा गुंड पोलिसांना सापडला. महिला पोलिसांच्या या दणक्यामुळे इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 18 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याने 14 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती. यातून त्या परिसरात तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. याप्रकरणी तरुणीने विवेकानंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपीचा शोध घेत असताना गौस मुस्तफा सय्यद हा ज्ञानेश्वर नगर परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले.
तिथे त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, या गुंडाला पोलिसांच्या वाहनात न बसवता रस्त्यानेच पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी विवेकानंद पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याने या कारवाईत पुढाकार घेतला होता.
गौस मुस्तफा सय्यद याला पोलिसी खाक्या दाखवतच तो रस्त्यावरचं गयावया करु लागला. तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही केविलवाणी अवस्था केली.
पोलिसांनी धडक कारवाई केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावले. पोलिसांनी रस्त्यावरुन त्याची काढलेली वरात अनेकांनी पाहिली मात्र मोबाईल फोनमध्ये शूट कोणी केली नाही.
दरम्यान, दशहत निर्माण करणाऱ्या या गुंडाला महिला पोलिसाने भररस्त्यात फटके दिले आणि पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरात अशाप्रकारे कोणी कृत्य करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.