Lakhimpur Rape-Murder Case: पोस्टमॉर्टम अहवालात अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, हत्या झाल्याची पुष्टी

लखीमपुर रेप-हत्या केस

Lakhimpur Rape-Murder Case: उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी येथे दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह लटकवल्याच्या संपूर्ण प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालाबाबत पोलिस सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार, गळा दाबून फासावर लटकवल्याची माहिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी दावा केला होता की, मुलींशी आधी मैत्री आणि नंतर बलात्कार करून त्यांची हत्या केली गेली असावी.

या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी लालपूर गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.

हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कलम 302, 306 आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलींच्या आईचे म्हणणे आहे की, गावातील एका मुलासह तीन अनोळखी मुले, ज्यांना मी माझ्या समोर आल्यावर ओळखू शकते, ते अचानक माझ्या घरात आले आणि त्यांनी माझ्या मुलींसोबत धक्काबुक्की केली.

त्यानंतर दोन्ही मुलींना उचलले आणि त्यांना थांबवल्यावर एकाने मला थांबवले आणि खाली लाथ मारली. त्याच्या साथीदारांनी दोन्ही मुलींना बळजबरीने मोटारसायकलवर बसवून उत्तरेला गावाबाहेरील शेतात नेले.

बराच वेळ शोध घेतल्यानंतर मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांची हत्या करून झाडाच्या फांदीला फासावर लटकवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अल्पवयीन बहिणींच्या आईच्या लेखी तक्रारीनंतर यूपी पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. काल घडलेल्या या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनीही पोलिसांनी मृतदेह बळजबरीने नेल्याचा आरोप करत गोंधळ घातला होता.

यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार चकमकही झाली. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोकोही केला. यादरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या लखीमपूर खेरीचे एसपी संजीव सुमन यांच्याशीही गावकऱ्यांचा वाद झाला.