हैदराबाद : तेलंगणामध्ये एका १३ वर्षाच्या मुलीवर आठ महिन्यांत तब्बल ८० हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुंटूरमधल्या पोलिसांनी काल म्हणजेच मंगळवारी या मुलीची सुटका केली आहे.
या प्रकरणी काल १० जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणामधल्या एका १३ वर्षीय मुलीला बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. आठ महिन्यांहून अधिक काळापासून ती वेश्याव्यवसायात अडकली होती. या काळात तिच्यावर ८० हून अधिक पुरुषांनी बलात्कार केला आहे.
या मुलीला सवर्णा कुमारी नावाच्या एका महिलेने दत्तक घेतले होते. जून २०२१ मध्ये या मुलीची आई कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होती.
तिथेच सवर्णा कुमारीशी तिची मैत्री झाली. त्यानंतर या मुलीच्या आईचा रुग्णालयातच मृत्यू झाला आणि मुलीच्या वडिलांना काहीही कल्पना न देता सवर्णा कुमारी या मुलीला घेऊन गेली.
ऑगस्ट २०२१ मध्ये या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याच आधारावर पोलिसांना मुख्य आरोपी सवर्णा कुमारी हिची ओळख पटली. या प्रकरणातली पहिली अटक या वर्षी जानेवारीमध्ये झाली होती.
त्यानंतर काल म्हणजेच १९ एप्रिल रोजी गुंटूर पश्चिमच्या पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली. पोलिसांनी या १३ वर्षीय मुलीची सुटकाही केली आहे. आरोपी आणि या मुलीच्या जबाबानंतर पोलिसांना या धक्कादायक प्रकाराविषयीची माहिती मिळाली आहे.