जम्मू-काश्मीरमध्ये ईदच्या दिवशीही जवानांवर दगडफेक; नमाज पठणानंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचा गोंधळ

श्रीनगर : देशभरात आज रमजान ईद साजरी होत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये या पवित्र दिवशीही लष्करी जवानांवर दगडफेक केली गेली. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका मशिदीसमोर तैनात असलेल्या जवानांवर दगडफेक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईदच्या नमाजनंतर जवानांवर दगडफेक करण्यात आली.

नमाज पढल्यानंतर काही लोक अचानक रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर काश्मीर प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर काहींनी जवानांवर दगडफेकही केली. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल लाठीचार्ज केला तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा देखील वापर करण्यात आला.

दगडफेकीनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.