नवी दिल्ली : मोबाईलचे टॅरिफ आणखी महाग होऊ शकतात कारण दूरसंचार सेवा कंपन्या मोबाईल टॅरिफ वाढवण्याचा विचार करत आहेत.
दरम्यान, निष्क्रिय वापरकर्त्यांमुळे दूरसंचार कंपन्यांचा ARPU (Average Revenue Per User) कमी होत आहे.
या वाढीमुळे कंपन्या महसूल वाढवण्याच्या उद्देशाने मोबाइल टॅरिफ वाढ करू शकतात. यापूर्वी वर्ष 2021 संपल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर, Airtel, Vodafone Idea व्यतिरिक्त, Reliance Jio ने प्रीपेड मोबाईल टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती, पण आगामी काळात टेलिकॉम कंपन्या प्रीपेडसोबतच पोस्टपेड मोबाइल टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, ट्रायने 5G सेवेसाठी स्पेक्ट्रमच्या किमतींबाबत सरकारला आपल्या सूचना सादर केल्या आहेत.
या बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी दूरसंचार कंपन्यांसाठी पैसा उभारण्यासाठी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या कंपन्या पुन्हा मोबाइल टॅरिफ वाढवू शकतात आणि यावेळी त्यांची नजर पोस्टपेड मोबाइल टॅरिफ आणि डेटा रेट्सवर आहे.
टॅरिफ वाढवण्याचे दिले संकेत
फेब्रुवारी 2022 मध्ये आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले होते.
आर्थिक निकालांच्या घोषणेनंतर, एअरटेलच्या उच्च व्यवस्थापनाने म्हटले आहे की, आणखी एक मोबाइल टॅरिफ वाढ केली जाऊ शकते.
पुढील 3 किंवा चार महिन्यांत मोबाइलचे दर वाढणार नसले तरी या कॅलेंडर वर्षात मोबाइल टॅरिफ वाढवले जाऊ शकतात आणि कंपनी टॅरिफ वाढवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असही कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाने सांगितले.
कंपनीच्या व्यवस्थापनानुसार ARPU (average revenue per user) 2022 मध्ये 200 रुपये करण्याचे लक्ष्य आहे, जे सध्या 163 रुपये आहे.
भारतातील मोबाईल टॅरिफ सर्वात स्वस्त
दरम्यान, मोठ्या स्पर्धेमुळे भारतातील मोबाईल टॅरिफ सर्वात स्वस्त आहेत, ज्याचा फटका संपूर्ण दूरसंचार क्षेत्राला सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सरकारला दूरसंचार कंपन्यांना बेलआउट पॅकेजही द्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत दूरसंचार सेवा प्रदात्यांना कोणत्याही किंमतीत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे.
त्यामुळेच प्रीपेड टॅरिफ वाढल्यानंतर आता पोस्टपेड टॅरिफ वाढण्याची शक्यता बळावली आहे.