मुंबई : रितेश देशमुख हे हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध नाव आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आहे. रितेशची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. अभिनेता म्हणून तो जितका श्रीमंत आहे तितकाच एक व्यक्ती म्हणूनही तो नेहमीच सर्वांची मने जिंकतो.
रितेश मुलगा, पती, वडील आणि भावाची प्रत्येक भूमिका मोठ्या जबाबदारीने पार पाडतो. आज नेहमी हसतमुख चेहऱ्याने सर्वांसमोर येणारा हाच अभिनेता गहिवरला आहे. अश्रू थांबत नाहीत, त्याला सतत माणसाच्या जाण्याने पोकळी जाणवते. ती व्यक्ती म्हणजे रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख.
विलासरावांच्या वाढदिवसानिमित्त रितेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
‘मला तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घ्यायचे आहेत. मला तुम्हाला आनंदात पाहायचंय, पाठीवर थाप मारून मी तुझ्यासोबत आहे असं मला म्हणाताना पाहायचंय. मला तुमचा हात धरुन चालायचंय. नातवंडाशी खेळताना, त्यांना पुढे घेऊन चालताना पाहायचंय… मला तुम्ही हवे आहात…. बाबा. आठवण येतेय तुमची’, असं लिहित रितेशनं विलासरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोबतच त्यानं काही फोटोही पोस्ट केले, जिथं रितेशची दोन्ही मुलं विलासरावांच्या फोटोपुढे हात जोडून उभी असल्याचं दिसत आहे.
एका मुलाच्या आयुष्यात वडिलांचा आधार किती महत्त्वाचा असतो हेच त्याची पोस्ट वाचताना पुन्हा लक्षात आलं आणि नकळतच डोळे पाणावले.