Dhule News : पेट्रोलिंग दरम्यान पाठलाग करुन भरधाव कारला रोखलं, चार जणांकडून 90 तलवारी जप्त

417
Dhule News : During patrolling, Karun Bhardhav Karla Rokhlam, four people seized 90 swords

धुळे : धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग करताना एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या.

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे.

सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने एक भरधाव स्कॉर्पिओ कार येत होती. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने गाडी न थांबवता आणखी जोराने पळवली.

यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पाठलाग करुन संबंधित गाडी थांबवून विचारणा केली.

यावेळी गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 90 तलवारी आढळून आल्या.

सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिस तपासात जालना येथे राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेले आरोपी हे चित्तोडगड इथून 90 तलवारी जालना इथे घेऊन जात असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

मात्र यामागील त्यांचा हेतू काय होता. तसंच या आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सध्या धुळे पोलीस करत आहे.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

दरम्यान या कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सोनगीर पोलिस करत आहे.

ही कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पथकासह पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव आणि विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.