संगमनेर, 16 मार्च : चारित्र्याच्या संशयावरून महिलेने आत्महत्या केल्यानंतर तिचा अंत्यसंस्कार केलेल्या ओट्याजवळच तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महिलेच्या आत्महत्या प्रकरणात तीने चिठ्ठीत उल्लेख केलेल्या दहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून त्यात जुन्नर तालुक्यातील आरोपींचाही समावेश आहे.
डोळासणे येथील एका विवाहितेने सोमवारी (दि.14) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या केली.
तिच्या चिठ्ठीत सागर रघुनाथ भालेराव, समीर रघुनाथ भालेराव आणि अन्य दोन महिला (सर्व रा.डोळासणे), गिरीश थोरात (रा.कळंब, ता.जुन्नर), किसन गायतडके (रा.जुन्नर), मंगेश कर्डिले (नाव व पत्ता माहिती नाही), रोहिदास उत्तर्डे व अन्य एक महिला (दोघेही रा.आपटाळे, ता.जुन्नर) या दहा जणांवर संशय व्यक्त केला.
या आरोपींनी मृत महिलेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केली. फोन करून मयतेचा पती, भाऊ, मुले व दीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते.
त्यानुसार घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून याप्रकरणी मृत महिलेच्या प्रियकराची आई व बहीण या दोघींना अटक केली.
त्यानंतर डोळासणे येथील स्मशानात मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही नागरिक सावडण्यासाठी गेले असता या विवाहितेवर अंत्यसंस्कार झालेल्या ओट्याजवळच सागर रघुनाथ भालेराव याचा मृतदेह आढळून आला.
याबाबत घारगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेतली. काही वेळातच पोलिस उपअधीक्षक राहुल मदनेही घटनास्थळी पोहोचले.
स्मशानात खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या सागर भालेराव याचे व आत्महत्या केलेल्या महिलेशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
या प्रकरणातील प्रत्येक दुवे शोधण्याचे काम सुरू असून रात्री स्मशानात कोण गेले होते, मयत तरुणाचा मोबाईलवरुन कोणाशी संपर्क झाला होता.
त्याच्या हत्येपूर्वी त्याच्यासोबत आणखी कोण होते, अशा सगळ्याच गोष्टींची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी व्यक्त केला.