बुलडाणा, 22 मार्च : प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी गोसिंग (ता. नांदूरा) शिवारात उघडकीस आली. मृतांमध्ये शेख अल्ताफ शेख शकील (२२, रा. गोसिंग ता. नांदूरा) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसिंग येथील शेख अल्ताफ हा तरुण सोमवारी (दि. 21) दुपारी बोकडांसाठी चारा आणण्यासाठी दुचाकीवरून शेतात गेला होता.
रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या वडिलांनी रात्री उशिरा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार शेताच्या बांधावर त्याची दुचाकी सापडल्यानंतर दिली.
दरम्यान, त्याचे नातेवाईक परिसरात शोध घेत असताना मंगळवारी सकाळी गोसिंग गावाच्या हद्दीतील एका विहिरीच्या काठी बेपत्ता अल्ताफचे दोन मोबाईल व चष्मा आढळून आला.
माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने विहिरीच्या पाण्यात शोध घेतला. ही तरुणी मोताळा तालुक्यातील तरोडानाथ येथील असल्याची माहिती मिळाली.
मृत मुलीचे वडील जालन्याला गेले होते. ती गावात आजीसोबत राहत होती. सोमवारी दुपारपासून मुलगी बेपत्ता असल्याची माहिती तिच्या आजीने दिल्यानंतर तिचे वडील रात्री गावात आले होते.
त्यांच्या घरी अल्ताफ नावाचा तरुण नियमित ये-जा करायचा. मंगळवारी (दि. 22) सकाळी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन ते पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी अल्ताफविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्याचवेळी गोसिंग शिवारातील एका विहिरीत अल्ताफ व एका मुलीचे मृतदेह असल्याची माहिती मिळाली. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अशोक रोकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.