Aurangabad Crime News : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील टापरगाव येथे एक धक्कादायक घटना घडली असून सैराटची पुनरावृत्ती झाली आहे.
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विशाल रमेश लव्हाळे (तापरगाव, कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे हे गुरुवारी सकाळी जखमी अवस्थेत घरी आला असता घराजवळ अचानक बेशुद्ध होऊन कोसळला.
विशालच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, विशालला कोणी मारहाण केली आणि तो जखमी कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला. याप्रकरणी विशालच्या वडिलांनी कन्नड ग्रामीणमध्ये फिर्याद दिली होती. कन्नड ग्रामीण पोलिसांनीही संशयास्पद मृत्यूप्रकरणी कसून तपास केला.
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय
पोलिस तपासात विशालला कृष्णाने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल आणि त्याच्या बहिणीचे अफेअर असल्याचा कृष्णाला संशय होता.
त्यामुळे त्याने विशाल लव्हाळे याला बोलावून लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोक्यावर लाकडी काठीने वार केल्याने विशालचा मृत्यू झाला.
विशालसोबत असलेले गणेश औटे आणि उमेश मोरे यांनाही आरोपींनी मारहाण केली. मृताचे वडील रमेश सांडू लव्हाळे यांनी कन्नड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली.
कन्नड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी कृष्णा दिगंबर पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
वडिलांच्या मोबाईलवरून फोन केला
विशाल लव्हाळे याचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर आरोपी कृष्णाने विशालला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवरून फोन केला.
त्यानंतर तो चिंचोली परिसरात गेला असता त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी होऊन विशाल टापरगावला घरी आला. मारहाणीमुळे तो खाली कोसळला आणि घरी आल्यावर त्याचा जागीच मृत्यू झाला.