श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) – ऐन रामनवमीच्या दिवशी श्रीरामपूर तालुका दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. येथील खैरी शिवारात पत्नी आणि मुलाची निर्घून हत्या करण्यात आली आहे.
पतीनेच आपल्या पत्नीला आणि मुलाला मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 302,498 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पत्नी अक्षदा बलराम कुदळे (वय, 27) मुलगा शिवतेज बलराम कुदळे (वय, 5) असे हत्या झालेल्यांचे तर, बलराम कुदळे आरोपीचे नाव आहे. बलराम याचा अक्षदा सोबत 2015 साली विवाह झाला होता, तो ट्रक वरती चालक होता.
मात्र, त्यानंतर ट्रक घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून अक्षदाला त्रास देत होता. दीड वर्षांपूर्वी अक्षदा 6 ते 7 महिने माहेरी होती. त्याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आलेली. मात्र, बलरामच्या घरच्यांनी मध्यस्तीने हा वाद मिटवला होता.
पण, बलरामच्या डोक्यात वेगळेच काहीतरी शिजत होते. श्रीरामनवमीच्या दिवशी बलरामने अक्षदाच्या डोक्यात कूदळ घालून तिची हत्या केली. त्यानंतर घरा शेजारी असणाऱ्या आमराईत असलेल्या 5 वर्षांच्या मुलाला गळफास देऊन मारुन टाकले.
निर्दयीपणाचा कळस म्हणजे हत्येनंतर अक्षदाच्या भावाला व्हिडीओ कॉल करत मी तुझ्या बहिणीला आणि भाच्याला मारून टाकले आहे मैतिला ये, असे सांगून कॉल कट केला. त्यानंतर नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दोघांच्या हत्येचे फोटो शेअर केले.
माहिती मिळताच अक्षदाच्या नातेवाईकांनी पोलिसांना खबर देत कुदळे वस्ती गाठली आहे. पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.