अपंग पती आणि दोन मुले सोडून प्रियकरासह महिला गेली पळून; जावयाला अडकवण्याचा रचला कट

0
27
A woman flees with her lover, leaving her disabled husband and two children behind

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला आपला अपंग पती आणि दोन मुलांना मागे सोडून प्रियकरासह गुजरातला पळून गेली होती.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी मृतदेह सापडल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती आपलीच मुलगी असल्याचा दावा करत तिच्या हत्येप्रकरणी जावयाला तुरुंगात पाठवण्याची तयारीही केली होती. मात्र महिलेची हत्या झाली नसल्याचे समोर येताच महिला व तिच्या कुटुंबीयांचा पर्दाफाश झाला.

पतीने पत्नीचा शोध घेतला

पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी केली. त्या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. दरम्यान, अपंग पती जागोजागी पत्नीचा शोध घेत होता. दरम्यान, अचानक पत्नी जिवंत घरी परतली. मात्र कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही.

पत्नी घरी परतली आणि…

अचानक दीड वर्षानंतर महिलेचा अपंग पती मोहम्मद गुलाब याला पत्नी घरी परतल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे गुलाबने तात्काळ पोलिसांसह सासूचे घर गाठले. तिथे पत्नी सीमा जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पोलिसांनी सीमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अज्ञात मृतदेहाची ओळख पटवली

चाकेरी येथील काशीराम येथे एका महिलेचा मृतदेह पोत्यात सापडला. त्यावेळी सीमाच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली होती. हा मृतदेह सीमाचा असल्याचा दावा तिच्या आईने केला आहे.

कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटली. तसेच, त्याचवेळी जावयावर संशय घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपंग पतीने घटस्फोट मागितला

पत्नीचे सर्व प्रताप लक्षात घेऊन अपंग पतीला मोठा धक्का बसला आहे. त्याने पत्नीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला असून तिच्याकडून घटस्फोट मागितला आहे. यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेतली आहे.

अधिक तपास केला असता पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादामुळे गुलाबची पत्नी यापूर्वीही अनेकदा घर सोडून गेली होती. सध्या पोलीस सीमाची कसून चौकशी करत आहेत.

हे प्रकरण लवकरच उघड होईल. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोट्या दावा केलेल्या मृतदेहाची ओळख देखील शोधली जात आहे.