जोधपूर : महाराष्ट्रातून सुरु लाऊडस्पीकरचा वाद राजस्थानच्या जोधपूरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ईदच्या पूर्वसंध्येला राजस्थानच्या जोधपूरमधील जालोरी गेटवर ध्वज आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली.
दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त, एसएचओ यांच्यासह अनेक जण जखमी झाले. अर्ध्या तासाच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. दुसरीकडे जोधपूरमध्ये अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जोधपूर शहरात रात्री उशिरा लाऊडस्पीकर आणि झेंडे हटवण्यावरून वाद झाला होता. शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटविण्यावरून रात्री ११.३० वाजता दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला.
दरम्यान, या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
नेमके काय झाले?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जालोरी गेट चौकात हिंदू ध्वज काढून मुस्लिम ध्वज लावण्यावरून वाद सुरू झाला. जालोरी सर्कलजवळ बॅनरही लावण्यात आले तसेच लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे.
स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज आणि ईदशी संबंधित बॅनर लावण्यात आल्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
निदर्शकांनी झेंडा आणि बॅनर काढून टाकल्याने गोंधळ झाला. इतर समाजातील लोक संतप्त झाले आणि दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, वाहनांचे नुकसान झाले, जमावाने लाऊडस्पीकरही खाली पाडले.
मात्र अर्धा तास दगडफेक थांबली नाही तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज करूनही दगडफेक थांबत नसताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.
रात्री उशिरा शहरात झालेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सियाग यांच्यासह दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. या सर्व प्रकारादरम्यान जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
महापौर, आमदारांचा पोलिसांवर आरोप
रात्री उशिरा पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सूरसागरचे आमदार सूर्यकांता व्यास आणि महापौर विनिता सेठ घटनास्थळी पोहोचले. जालोरी गेट पोलीस चौकीबाहेर बसून दोघांनी एकीकडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.
दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याचे आमदार सूर्यकांता व्यास यांनी सांगितले. मग पोलिसांनी एकीकडे लाठीमार का केला? त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जोधपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश
रात्री उशिरा जोधपूर शहरात दगडफेकीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दुपारी दोन वाजता शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जारी केले.
मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच संवेदनशील भागात आणि घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही, मोबाईल फुटेजवरून तपास सुरू केला
जलौरी गेट येथे लाऊडस्पीकर, ध्वज हटवण्यावरून झालेल्या हिंसाचाराचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस आयुक्त नवज्योती गोगोई यांनी सांगितले की, घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळी दोन्ही पक्षांनी केलेले मोबाईल व्हिडिओ तपासले जात आहेत. तसेच दगडफेक कोणी सुरू केली आणि ज्यांनी दगडफेक केली, त्यांची ओळख पटवून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.