Shringar Gauri-Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिदीच्या निर्णयाबाबत उत्सुकता, न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त

District Court Decision in Shringar Gauri-Gyanvapi Masjid Case

Shringar Gauri-Gyanvapi Masjid Case : वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणात जिल्हा न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश या प्रकरणी निर्णय देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कलम 144 लागू करण्यात आले असून कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

वाराणसीमध्ये सध्या 2 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. एवढेच नाही तर न्यायालय परिसरात 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

त्याशिवाय बॉम्बविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे. साध्या वेशातील पोलिसही या परिसरावर लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला न्यायालयाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई आहे.

संपूर्ण शहर वेगवेगळ्या विभागात विभागले गेले आहे. जेणेकरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. गरज भासल्यास आणखी पोलिस तैनात केले जातील.

पोलिसांना संवेदनशील भागात फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हॉटेल, गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्णा यांनी 24 ऑगस्ट रोजी आपला निकाल राखून ठेवला होता आणि 12 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे जाहीर केले होते.

त्यानुसार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. काशी विश्वनाथ-ज्ञानवापी संकुलातील शृंगार गौरी स्थळाची पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी पाच हिंदू महिलांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यापूर्वी मशीद संकुलावर शिवलिंगासारखी रचना आढळून आली होती. ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा मशीद समितीने केला आहे.

न्यायालयाने नियुक्त केलेले विशेष सहाय्यक आयुक्त विशाल सिंह यांनी 19 मे रोजी वाराणसी न्यायालयात सादर केलेल्या ज्ञानवापी मशीद व्हिडिओ सर्वेक्षण अहवालाचा हे निष्कर्ष आहेत.