धक्कादायक! ऑनलाइन क्लासमध्ये ८९ टक्के विद्यार्थ्यांची हेरगिरी, मुलांची खासगी माहिती कंपन्यांना विकली

नवी दिल्ली : कोरोना काळात विद्यार्थी ऑनलाइन क्लास करत होते तेव्हा अँड्राॅइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाहिरात कंपन्या १६४ ॲप्समधून ८९ टक्के मुलांची हेरगिरी करत होत्या.

मानवाधिकार संस्था ह्यूमन राइट्स वॉचने ॲप्स आणि तंत्रज्ञानाची तपासणी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलांवर लक्ष ठेवले जात होते, हेरगिरी केली जात होती.

जगातील ४९ देशांत मुलांवर नजर ठेवण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून अमेरिका, ब्रिटन, चीन, भारत यासारख्या ४९ देशांतील मुलांची माहिती २०० जाहिरात कंपन्यांना कोट्यवधी डॉलरमध्ये विक्री करण्यात आली.

जवळपास ७० टक्के मुलांची हेरगिरी अँड्राॅइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून करण्यात आली. ॲप्सच्या माध्यमातून अशी हेरगिरी गत १५ वर्षांपासून होत आहे.

जाहिरात कंपन्या मुलांचा हा डेटा उत्पादन कंपन्यांना उपलब्ध करतात आणि त्या कंपन्या याचा अभ्यास करून उत्पादन बाजारपेठेत आणून कोट्यवधी रुपये कमवितात.

वॉचने मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ या काळातील रिमोट- लर्निंग ॲप्सची चौकशी केली. १६४ ॲप्समधील १४६ ॲप्स असे होते ज्याचे तंत्रज्ञान मुलांची गोपनीयता धोक्यात टाकणारे होते.

कशाची झाली हेरगिरी
– मुले कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या भागातील आहेत आणि कसा व्यवहार करतात.
– मुले घरातील कोणत्या रूममध्ये किती वेळ आहेत. स्क्रीनवर काय काय करत आहेत.
– मुले मित्रांशी काय बोलतात.
– क्लासच्या वेळेत काय खातात.
– मुलांच्या पालकांची कोणत्या प्रकारची उत्पादने खरेदी करण्याची क्षमता आहे.

सावध राहून करावा उपयोग

डेटा प्रोटेक्शन कायदा येईपर्यंत सावध रहा. स्मार्ट फोनचा वापर स्मार्ट पद्धतीने करावा. ॲप डाऊनलोड करताना पॉलिसी काळजीपूर्वक वाचा.
– व्ही. राजेंद्रन, चेअरमन,
डिजिटल सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, चेन्नई

  • १६४ ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मच्या विश्लेषणातून माहिती समोर
  • २०० जाहिरात कंपन्यांनी मुलांचा खासगी डेटा अब्जावधी रुपयांत विक्री केला