केंद्रीय राखीव पोलिस दल – सीआरपीएफचा आज ८३वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त जम्मू इथल्या मौलाना आझाद मैदानात सुरु असलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वार्षिक परेडचे निरीक्षण केले.
- युक्रेनमधल्या सुमी शहरात अडकलेल्या बांग्लादेशी नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. बांगलादेशला भारत सरकारने केलेली मदत दोन्ही देशांच्या विशिष्ठ आणि दीर्घकालीन संबंधांचं उदाहरण असल्याचं, शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
- राज्यात काल सकाळपासून १ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यातल्या पात्र नागरिकांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकंदर संख्या १५ कोटी ८२ लाखाच्या वर गेली आहे.
- त्यात ६ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर १६ लाख ६२ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
- १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ५९ लाख ५९ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
- भारत आणि जपान दरम्यान १४वी शिखर बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निंमत्रणावरुन जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो या शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात, तसंच क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
- पंजाब सरकारच्या दहा मंत्र्यांचा आज शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करुन या मंत्र्यांची यादी जाहीर केली.
- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. भाजपने काल या जागेसाठी सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- छत्तीसगढ इथं नक्षलवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आलेले सोलापूरचे सैनिक रामेश्वर काकडे यांच्या कुटुंबियाना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही सोलापूचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भरणे यांनी काल काकडे यांच्या गावी गौडगाव इथं जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
- मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वात जास्त ४३ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. नांदेड जिल्ह्यात ४१, परभणी आणि बीड जिल्ह्यात सरासरी ४०, तर औरंगाबाद जिल्ह्यात काल ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.