प्रादेशिक ठळक बातम्या : राज्यात भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | विविध महत्वाच्या 25 बातम्या

Regional Marathi News Bulletin | Quick review of top 10 news from home and abroad

आज चैत्र शुद्ध गुढी पाडवा, मराठी नववर्षाचा प्रारंभ घरोघरी मोठ्या उत्साहात केला जात आहे. राज्यात यानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम होत असून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

****

राज्यात भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते आज मराठी नव वर्षाच्या प्रारंभाच्या मुहुर्तावर झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते.

भाषा ही संस्कृतीची ओळख आहे तसंच मराठी भाषेची सक्ती करावी लागते, हे दुर्दैव असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या कामाचं भूमीपूजनही आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं.

सरकारमध्ये कुठेही रुसवे-फुगवे नाहीत, आपल्या सरकारचं नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचं नियोजनबद्ध काम करत आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचं जावो अशी आपण प्रार्थना करतो. आगामी वर्षात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेतीचंद, नवरेह तसंच साजिबू चेराओबाच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८४ कोटी ५२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल १८ लाख ३८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या १ हजार २६० रुग्णांची नोंद झाली, ४ हजार ४०० हून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

देशात सध्या १३ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे. या संसर्गातून आता पर्यंत ४ कोटी २४ लाख ९२ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात या संसर्गासाठी ७९ कोटीहून अधिक चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात ५ लाख २८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण `म्हाडा`चा वर्ष २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प आणि वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणाला नुकताच सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या वर्ष २०२२-२०२३ च्या दहा हजार ७६४ कोटी ९९ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२१-२०२२ च्या सुधारित सात हजार ९७६ कोटी ७४ लाख रुपयांच्या रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली आहे.

वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या औरंगाबाद तसंच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोंकण या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५ हजार ७८१ सदनिकांचं बांधकाम करण्याचं प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात सात हजार एकोणीस कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

दौलताबादजवळ आज सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डब्बे घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. या अपघातामुळं रोटेगाव- काचीगुडा प्रवासी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकावर तर जालना -दादर जनशताब्दी औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती.

निजामाबाद- पुणे प्रवासी रेल्वेही औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. अमृतसर -नांदेड सचखंड जलद रेल्वेला लासुर स्थानकावर थांबवण्यात आलं होतं. रेल्वे वाहतूक आता सुरळित होईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी राज्य शासनानं अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून ५ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहेत.

****

रमजान महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. आज संध्याकाळी चंद्रदर्शन होणार असून आज रात्रीच पहिली तरावीहची नमाज अदा करण्यात येणार आहे.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आजपासून शिथील करण्यात आले आहेत. मास्कचा उपयोगही ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.

****

देशात गेल्या मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. आतापर्यंतचं हे सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर संकलन आहे.

****

दौलताबाद रेल्वे स्थानकानजीक एका मालगाडीचे आठ डबे आज सकाळी घसरले. यामुळं या भागातली रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून दुपारी एक वाजेनंतर वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण- `म्हाडा`नं या वर्षी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ५६५ पदांसाठी घेतलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचे सर्व उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन घेतलेल्या या परीक्षेचे गुण म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

****

विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह, आत्मविश्वास आणि मुक्त वातावरणात परीक्षेला सामोरं जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देश -विदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान मोदी यांनी काल संवाद साधला. एप्रिल महिन्यात आपल्याकडे अनेक सण उत्सव असतात, हाच परीक्षांचाही काळ असतो. त्यामुळे या उत्सवी वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षांचाच उत्सव करत, कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले ‘‘पहिली बात है की, आप मन में यह बात तय कर लिजीए की परीक्षा जिवन का एक सहज हिसा है हमारी विकास यात्रा का छोटे छोटे पडाव है. और इस पडावसे हमें गुजरना है हम गुजर चुके है जब इतनी बार हम Exam दे चुके है Exam देते देते एक प्रकारसे हम ExamProof हो गये है अब जब ये विश्वास पैदा हो जाता है तो यह नहीं आनेवाले किसी भी Exam के लिए ये अनुभव आपने आपमें आपकी ताकत बन जातें है.’’

****

मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहिला.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या ४४२ विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम दूरदर्शनच्या वाहिनीवरून पाहिला. या कार्यक्रमात विद्यालयाचे ४० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

वाशिम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयातले ४९५ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्याध्यापक सचिन खरात यांच्यासह ४० शिक्षक आणि १०० पालकांनी थेट प्रसारण पाहिलं.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपला आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री सचिवालयानं याबाबत काल पत्रक जारी करुन या वृत्ताचं खंडन केलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरु होती.

यासंदर्भातील बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत. गृहमंत्री उत्तम काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलतांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, गृह विभागावर नाराज नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले… ‘‘माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी खुलासा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं केलेला आहे. अशा प्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासमध्ये घेवूनच सगळे निर्णय घेत असतो.’’

गृहखात्याच्या कामकाजात जर काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा केली जाईल असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या ११२ तसंच महिला आणि बालक सायबर गुन्हे प्रतिबंधक प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे.

याशिवाय मुंबई मेट्रोच्या मार्गिका क्रमांक ७ आणि २ अ यांचं लोकार्पण, मराठी भाषा भवन तसंच वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही आज केलं जाणार आहे.

****

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये दुरुस्ती करुन त्यातील अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांनं मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

२०१३ मध्ये केंद्र सरकारनं ९७ वी घटना दुरुस्ती करतांना सहकार अधिनियमात मोठ्या प्रमाणात बदल केले होते. त्यानुसार राज्यानंही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये बदल केले होते. यातील काही बदल राज्याच्या दृष्टीनं सहकार क्षेत्रासाठी बाधक ठरत होते.

घटनेतील तरतुदीमुळे राज्य शासनाला या अधिनियमातील तरतुदीत कोणतेही बदल करता येत नव्हते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सहकार कायदा हा राज्य सुचीमध्ये येत असल्यामुळे तो राज्याचा विषय असल्याचा निर्वाळा देत ९७ वी घटना दुरुस्ती रद्द केली. त्यामुळे राज्याला या अधिनियमात दुरुस्ती करता येण शक्य झालं.

****
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातल्या ५७९ अर्जाना या योजने अंतर्गत मंजुरी मिळाली आहे.

राज्यातले सर्वच जिल्हे या योजनेत सहभागी झाले असून औरंगाबाद, सांगली आणि पुणे जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्याला मिळालेल्या यशाबद्दल कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं भुसे यांनी अभिनंदन केलं.

****

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खटला दाखल करणारे, काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नागपूरचे वकील सतीश उके यांना विशेष सक्तवसुली संचालनालय- ईडीच्या न्यायालयानं येत्या ६ एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं काल उके आणि त्यांच्या भावाला अटक केली होती. शस्त्रांचा धाक दाखवून जमीन बळकावल्याचा आरोप ईडीनं उके यांच्यावर ठेवला आहे.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसूल करण्यासह अनेक आरोप केले होते.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७४ हजार १४७ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८५ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.

काल ११२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २५ हजार ४५१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनं देशभरातल्या सर्व पथकर नाक्यांवरील पथकरात कालपासून दहा ते ६५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मोटारीसाठीच्या दरात दहा रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठीच्या दरात ६५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गावर एकूण ३२ पथकर नाके कार्यरत आहेत.

****

राज्यात वाहनात इंधन म्हणून वापरण्यात येणारा -सीएनजी आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा पीएनजी वायू या नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कर तीन टक्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय वायू कंपन्यांनी घेतला आहे. कालपासून या नव्या दराची अंमलबजावणी सुरू झाली.

यापूर्वी हा दर साडेतेरा टक्के होता. त्यामुळे घरात पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचं सीएनजी इंधन स्वस्त झालं आहे.

नवीन दरानुसार औरंगाबादमध्ये सीएनजीचा दर ७५ रुपये ९५ पैसे प्रति किलो झाला आहे. या इंधनावरचा मूल्य वर्धित कर कमी करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली होती.

दरम्यान, व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी २५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, हलवाई तसंच केटरिंग व्यावसायिकांना या दरवाढीची झळ पोचणार आहे.

****
आज चैत्र शुध्द गुडी पाडवा, मराठी नववर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. या निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा मंगल दिवस तसंच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटल आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे नववर्ष आशा, आकांक्षाचं नवं पर्व घेऊन येईल असं आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुढीपाडवा तसंच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आज संध्याकाळी चंद्रदर्शन होणार असून त्यानंतर मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. आज रात्रीच पहिली तरावीहची नमाज अदा करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ, म्हैसमाळ आणि शुलीभंजन या पर्यटन स्थळाच्या विविध विकास कामांसाठी पर्यटन विभागानं एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लेणी परिसरात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीदेखील दहा लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या वाहनांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वत: काल मध्यरात्री कारवाई केली.

नदीपात्रामध्ये विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर, वायर रोप आणि यारी मशीनद्वारे क्रेनच्या सहाय्यानं वाळू उपसा करताना आढळून आल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं.

भविष्यात पुन्हा बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी वापर होऊ नये म्हणून या साहित्यांना यावेळी आग लावून ते नष्ट करण्यात आले. तसंच उत्खनन केलेला अंदाजे १५० ब्रास वाळू साठा पाटेगावच्या तलाठ्यांच्या ताब्यात देण्यात आला.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारीमध्ये पूर्णा नदीत अवैद्य रित्या साठा करून ठेवलेला ५६० ब्रास वाळू साठा महसूल विभागानं काल जप्त केला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील हासेगाव इथल्या एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा काल उष्माघातानं मृत्यू झाला. लिंबराज तुकाराम सुकाळे असं या शेतकऱ्याचं नाव असून शेतात काम करत असतांना त्यांना चक्कर आली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यु झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेनं काल राज्यभरात लाक्षणिक धरणे आंदोलन केलं. उस्मानाबाद जिल्हा शाखेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. या धरणे आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी झाले होते.

प्रलंबीत सेवा विषयक मागण्याचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. औरंगाबाद आणि परभणी इथंही काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुटी असल्यामुळं आज औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय घाटीचा बाह्यरूग्ण विभाग बंद राहणार आहे. उद्या रविवारी हा विभाग सुरू राहणार असल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे.

****

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काल औरंगाबाद शहरात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल पंपासमोर निदर्शनं करण्यात आली. देशात जीवनावश्यक वस्तूंचे, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

****

औरंगाबाद महापालिकेचा लिपिक प्रभू चव्हाण याला साडे तीन हजार रुपये आणि विदेशी मद्याची बाटली लाच म्हणून घेतांना लाचलचुपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहाथ पकडलं.

प्रभू चव्हाण यानं थकीत मालमत्ता कर कमी करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती साडेतीन हजार रुपये लाच आणि विदेशी मद्याच्या बाटलीची मागणी केली होती. लाचलचुपत प्रतिबंधक पथकानं त्याला सापळा रुचून रंगेहात पकडलं.

****

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.