पुणे : प्रियकर-प्रेयसीच्या वादात प्रियकराच्या मित्राचा नाहक बळी गेला. ही घटना शुक्रवारी रात्री लोकमान्यनगर येथे घडली. प्रेयसीच्या मामाने तलवारीने सपासप वार करत हा खून केला.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल वाळंजे यानी फिर्याद दिली आहे. तर महेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एक 22 वर्षीय तरुणी एका दागिण्यांच्या दुकानात काम करते, तर राहुल हा तीचा प्रियकर आहे.
तिला वडिल नसल्याने तीचा संभाळ तिचे मामा करतात. मामांचा ऑफसेट प्रिटींगचा व्यवसाय आहे. संबंधीत तरुणीला तिच्या दुकानातील व्यवस्थापक गाडीवरुन घरी सोडताना राहुलने बघितले होते.
याचा जाब तिला काल रात्री राहुलने लोकमान्यनगर येथे विचारला. त्याने केलेल्या शिवीगाळीमुळे ती भेदरली होती.
तिने फोन करुन तिच्या मामांना बोलावून घेतले. यावेळी मामांचे आणि राहुलचे वाद झाले.
ही भांडणे सोडवण्यासाठी राहुलचा मित्र महेश गायकवाड मध्ये पडला. त्याच्यावर रागाच्या भरात मामांनी तलवारीने सपासप वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मृत झाला.