लातूर : देशातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी आणि देशातील मच्छिमारांच्या हित संवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (PM Matsya Sampada Yojana) सन 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थीमुख होण्यासाठी सन 2022-23 वर्षाकरिता विविध उपघटकातंर्गत दिनांक 13 जून, 2022 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची (PM Matsya Sampada Yojana) प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. केंद्र शासनामार्फत मत्स्य व्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे व याद्वारे भुजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे / मत्स्य व्यवसायीकांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे, कृषि क्षेत्राच्या सकल मुल्यात वाढ करणे आणि निर्यातीत योगदान वाढविणे.
PM Matsya Sampada Yojana अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतुद
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतंर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 40 टक्के ( केंद्र हिस्सा 24 टक्के व राज्य हिस्सा 16 टक्के ) व अनुसूचित जाती / जमाती / महिला या प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 60 टक्के ( केंद्र हिस्सा 36 टक्के व राज्य हिस्सा 24 टक्के) या सुत्राप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतुद आहे. प्रकल्प किंमतीच्या अर्थसहाय्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही लाभार्थी हिस्सा असेल.
PM Matsya Sampada Yojana योजनांचा समावेश
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतंर्गत लाभार्थीभिमूख भुजलाशयीन मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरिता नवील तळी / तलावांचे बांधकाम अस्तीत्वातील तळी / तलावांचे नुतणीकरण, मत्स्य / कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान, भारतीय प्रमुख कार्प व इतर संवर्धानायोग्य माशांच्या बीज उत्पादनासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना विमाछत्र, प्रशिक्षण कार्यक्रम बर्फ कारखाना , शीरोधक वाहने, पुनर्चक्रीय पध्दतीने मत्स्यसंवर्धन आणि जैवपुंज पध्दतीने मत्स्यसंवर्धन इत्यादी प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेची अधिक माहिती http://dof.gov.in/pmmsy व http://nfdb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तसेच लातूर जिल्ह्यात प्रस्तूत योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर (जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर दुरध्वनी क्रमांक 02382-299326) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांनी केले आहे.