चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयित पती फरार; जत तालुक्यातील घटना

जत : चारित्र्याच्या संशयावरून एकाने बेडग्याने डोक्यात मारून पत्नीचा खून केल्याची घटना जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे येथे घडली आहे. केशराबाई बाळासाहेब सावंत (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनेनंतर संशयित पती बाळासाहेब संदीपान सावंत फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मृत केशरबाई सावंत भाजीपाला विकत असत. आसपासच्या गावांमधील बाजाराच्या दिवशी भाजीपाला जाऊन विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता, तर पती बाळासाहेब शेती बघतो.

या दाम्पत्याला सात एकर शेती असून, त्यात भाजीपाला लावण्यात आला होता.

बाजारहाट करण्यासाठी केशरबाई बाहेरगावी फिरत असल्याने बाळासाहेब वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता.

या वादातून दोघांमध्ये सारखे खटके उडत. या कारणातूनच मंगळवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले.

रागाने पेटलेल्या बाळासाहेबने जमीन खोदण्याचे बेडगे केशरबाई यांच्या डोक्यात घातले. डोळ्याच्या व कानाच्या मध्ये घाव घातल्याने केशरबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर बाळासाहेब सावंत फरार झाला आहे. या दोघांना तीन मुली आहेत.

एका मुलीचे लग्न झाले असून, दुसऱ्या मुलीसाठी स्थळ बघणे सुरू होते.

याप्रकरणी बाळासाहेब याच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.