पुणे : मनोहर भिडे यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. त्यासोबत त्यांनी भारतमातेचा दिलेला संदर्भ अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील तमाम महिला त्यांचा निषेध करतील. सत्ताधाऱ्यांकडून अशी प्रवृत्ती जोपासली जात आहे.
होय, महाराष्ट्रातील महिलांनी निषेध करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकली का लावली नाही, असा सवाल करून बाईट देण्यास नकार दिला होता. आधी टिकली लाव. मग बोलतो, असे ते म्हणाले होते. या वक्तव्याचा समस्त महिलांकडून विरोध व निषेध व्यक्त केला जात आहे.
मनोहर भिडे यांच्याशी माझा संबंध नाही. मी त्यांना कधी भेटायला कधी गेलो नाही. माझ्या आईच्या मृत्यूच्या वेळी रक्षा विसर्जनासाठी ते आले होते. त्यांनी असभ्य वक्तव्य करून समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. भिडे सारखी प्रवृत्ती सरकार जोपासत आहे.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प बसले. राज्यातील सुशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे.
फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्यात आला असता तर किमान तीन ते चार लाख रोजगार निर्माण झाले असते. टाटांनी विमाने तयार करण्यासाठी कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला. ती कंपनीही बडोद्याला गेली.
या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार गुजरातची सेवा करण्याचे काम करत आहे. पोलीस भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
या सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र त्यातही अडथळे आणले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
महाविकास आघाडी पेक्षा आपण किती चांगले आहोत, हे या सरकारला सिद्ध करायचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. या सरकारचा आत्मविश्वास कमी झाला आहे.
केंद्र सरकार व गुजरात पुढे हे सरकार हतबल झाले आहे. पूर्ण पान जाहिरातीऐवजी फॉक्सकॉनच्या मालकाला भेटा. जाहिरातीने सरकार व राज्य चालत नाही, रोजगार आला तर येथील तरुणांना काम मिळेल.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जाहीर करत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. सरकारी जाहिरात सर्व पेपरमध्ये आहेत.
5 ते 10 लाखांची जाहिरात घेऊन जाहिरातदार दारात आला तर कोणता पेपर नाकारणार आहे. सरकारच्या जाहिराती फसव्या आहेत. दिशाभूल करणाऱ्या आहेत. सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला.