सांगली, 20 जून : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
महिसाळ येथील वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावे लिहिली आहेत. या प्रकरणाच्या तपासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
मात्र या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. दरम्यान डॉ.माणिक वनमोरे यांच्यावर असलेले प्रचंड कर्ज थकल्याने आर्थिक अडचणीमुळे वनामोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे.
आज नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनामोरे यांची आई, पत्नी आणि मुलांचा आणि त्यांचे शिक्षक भाऊ पोपट यल्लाप्पा वनमोरे यांचा समावेश आहे.
डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे यांची पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई अक्ताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतणे शुभम पोपट वनमोरे यांचे मृतदेह सापडले आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.