राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची अखेर जामिनावर मुक्तता करण्यात आली.
22 जून रोजी जामीन मंजूर होताच केतकी चितळेची 23 जून रोजी ठाणे कारागृहातून सुटका झाली होती. पोलीस कोठडीतून बाहेर येताच केतकी चितळेने इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत केतकी चितळे हिने पोलीस कोठडीत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
केतकीने म्हटले की, मला माझ्या घरातून बेकायदेशीरपणे अटक केली, कोणत्याही नोटीस, अटक वॉरंटशिवाय मला जेलमध्ये टाकले. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलं नाही. मी सत्य बोलले.
त्यामुळे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकत होते. जेलमध्ये मला मारहाण झाली, माझा विनयभंग झाला, कोठडीत माझ्या अंगावर शाईच्या नावाखाली विषारी काळा रंग टाकला, असा आरोप केतकीने केला आहे.
जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, पण मी जामिनावर बाहेर आहे, लढा अजूनही सुरूच आहे, माझ्यावर 22 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका प्रकरणात मला जामीन मिळाला आहे; केतकी म्हणाली.
वादग्रस्त पोस्टबाबत केतकी म्हणाली की, पोस्टमध्ये फक्त पवारांचा उल्लेख होता, पण लोकांनी त्याचा संबंध शरद पवारांशी जोडला. मी पोस्टमध्ये कोणाचाही अपमान केलेला नाही.
शरद पवार असे आहेत असे लोक म्हणू पाहत आहेत का? माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादी आणि इतर लोकांना मला विचारायचे आहे.