Shivaji Park Dussehra Melawa : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान यावर्षी मोकळेच राहणार?

Dasara Melava

Shivaji Park Dussehra Melawa : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार याबाबत वाद सुरू असतानाच यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मोकळे राहण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त प्रकरणामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचे कारण देत शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचे अर्ज मुंबई महापालिका फेटाळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील कायदेशीर वाद आणि दादर प्रभादेवीतील सध्याच्या तणावाच्या स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने कोणत्याही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देऊ नये, असे मत मुंबई महापालिकेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. पार्क.

सध्या दादर प्रभादेवी परिसरात दोन गटातील वादामुळे तणाव वाढला आहे, अशा स्थितीत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांनी अर्ज केला आहे.

मात्र, खरी शिवसेना कोणाची, हा वाद प्रलंबित असताना कोणाच्याही अर्जावर निर्णय घेणे पालिका प्रशासनाला अवघड होऊ शकते.

त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांशी चर्चा करून शिवाजी पार्क मैदानासाठी महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारू शकते.

याबाबत महापालिकेने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, सध्या जी नॉर्थ वॉर्ड प्रशासन याबाबत विधी खात्याचा सल्ला घेत आहे.

महापालिका प्रशासनापुढे पेच

शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटाने शिवतीर्थ म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे.

दोन्ही गट शिवतीर्थासाठी आग्रही आहेत. महापालिकेकडून दोन्ही गटांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. मात्र नेमकी कोणाला परवानगी द्यायची असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

त्यामुळेच आता दसरा मेळ्याच्या संदर्भात महापालिका प्रशासन आपल्या विधी विभागाशी सल्लामसलत करण्याचा विचार करत आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू जपण्यासाठी पालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

दादर येथील महापालिकेच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त

दादर येथील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या खडाजंगी सुरू आहे. शिवतीर्थाला परवानगी मिळावी यासाठी दोन्ही बाजूंनी प्रशासनावर दबाव आहे.

दादर येथील जी नॉर्थ महापालिका कार्यालयाबाहेर राजकीय राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी मिळेपर्यंत मुंबई पोलीस जी नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त तैनात ठेवणार आहे.