Crime News : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या महिलेचे तिच्या दीरासोबत प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमप्रकरणात तिचा नवरा अडथळा ठरत होता. त्यातून तिने प्रियकर आणि त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.
विशेष म्हणजे आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने मृत पतीचे डोके धडापासून वेगळे केले आणि मृतदेह घरात लपवून ठेवला. तब्बल दीड वर्षानंतर तिच्या या अमानवी कृत्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एखादी स्त्री आपल्या पतीशी इतकी क्रूर कशी वागू शकते? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित घटना 2021 साली रीवा जिल्ह्यातील मौगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावात घडली होती. गावातील 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते.
त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रामसुशीलचे पुन्हा लग्न लावून दिले. बिटोल उर्फ रंजना पाल हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर रंजनाचे तिचे दीरासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
रंजनाच्या पतीला त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच तो संतापला. या मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. रंजनाला वाटू लागले की तिचा नवरा अडथळा ठरत आहे.
तेव्हा तिने प्रियकर दीरासोबत एक खुनी योजना आखली. तिने पतीला मारण्याचा निर्णय घेतला. या पापात तिच्या चुलत सासऱ्यांनीही तिला साथ दिली.
याशिवाय इतर काही लोकांनीही या कटात सामील झाले. रंजना आणि तिच्या प्रियकराला वाटले की जर त्यांनी रामसुशीलला मारले तर त्याची संपत्तीही त्यांची होईल. त्यामुळे त्यांनी रामसुशीलला मारण्याचा कट रचला.
रंजनाने पतीला प्रेमाने समोसे खाऊ घालण्याचे नाटक केले. तिने त्या समोशात उंदराचे विष टाकले होते. रामसुशीलनं तो समोसा खाल्ला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
पतीच्या निधनानंतर रंजना आणि तिचा प्रियकर आनंदी होते. ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी रामसुशीलचे डोके शरीरापासून वेगळे केले आणि मृतदेह घरात लपवून ठेवला.
दरम्यान, गेल्या दीड वर्षात मृतदेहाचे सर्व अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे त्यांनी उर्वरित मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की आता शरीर पूर्णपणे खराब झाले आहे.
त्यामुळे मृतदेह कुठेही जंगलात टाकला तरी कोणाला तरी समजेल. त्यामुळे त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी मृतदेह भाटीच्या जंगलात फेकून दिला.त्यानंतर ती महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरला रवाना झाली.
दरम्यान, मध्य प्रदेश पोलिसांना भाटीच्या जंगलात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून तो मृतदेह नेमका कोणाचा आहे हे समजणे कठीण आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात कोणी बेपत्ता आहे का, याची चौकशी सुरू केली. दरम्यान, काही ग्रामस्थांनी रामसुशीलचे नाव घेतले.
अनेक दिवसांपासून रामसुशील दिसला नाही. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नीही येथून निघून गेल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी अधिक तपास करून महिलेच्या शोधासाठी एक पथक मिर्झापूरला रवाना केले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने लगेचच आपला गुन्हा कबूल केला.
यावेळी तिने तिचा दीर, चुलत सासरा व इतर आरोपींची नावेही सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.