पुणे : दोन लग्ने लपवून लग्नाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ संभाजी कोद्रे (वय 38, रा. मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. ती पुण्यातील सदाशिव पेठेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने अपना एपद्वारे नोकरीसाठी अर्ज केला होता. यातून फिर्यादीला हॉटेल रिजन्सीमधून फोन आला. तेव्हापासून आरोपी व फिर्यादी यांची ओळख होती.
आपण हॉटेलचा मालक असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादीशी मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध झाले.
दरम्यान, आरोपीने यापूर्वीही दोन लग्न केले होते. हे लपवून त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले आणि फिर्यादीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
आरोपी विवाहित असल्याचे फिर्यादीला समजल्यानंतर एक दिवस तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.