Crime News : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात वेडी होऊन तिच्या मृत्यूचा बनाव रचून प्रियकरापर्यंत पोहोचली आणि त्याच्याशी लग्न केले.
महिलेच्या सासरच्यांनी आणि गावकऱ्यांनीही तिचा मृत्यू झाल्याचा कयास लावला होता. प्रियकरासोबत ती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
महिलेचे म्हणणे आहे की, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. तिने पतीवर मारहाणीचा आरोपही केला आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता ही महिला नदीवर जाण्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडली होती.
बराच वेळ ती घरी न पोहोचल्याने पतीने पत्नीला नदीकाठी शोधले. तेव्हा तिथे महिलेची चप्पल आणि सामान सापडले. यानंतर महिला नदीत वाहून गेल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली.
घटनेची माहिती अलोट पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ टीमची मदत घेतली.
मात्र बराच शोध घेतल्यानंतरही महिलेचा काहीही पत्ता लागला नाही. महिलेच्या सासरच्यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
दोन दिवसांनी पोलीस ठाणे गाठले
बुधवारी ही महिला बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनंतर शुक्रवारी तिने तिच्या प्रियकरासह अलोट पोलीस ठाणे गाठले, जिथे तिला जिवंत पाहून सर्वजण थक्क झाले. पतीला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, ती तिची चप्पल आणि सामान नदीकाठी सोडून पायीच प्रियकरापर्यंत पोहोचली होती. प्रत्येकाने तिला मृत समजावे, म्हणून तिने हा बनाव केला असल्याचे कबूल केले.
प्रथम ती अनवाणी पायी चालत आलोटला पोहोचली, तेथून ती बसमध्ये बसून चौमहालाला गेली. त्यानंतर तिथून ती कथित प्रियकराला भेटण्यासाठी राजस्थानला पोहोचली. तिथे शिवमंदिरात दोघांनी लग्न केले.
तिच्या हृदयाला पाझर फुटला नाही
पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला खूप समजावले, मात्र ती महिला प्रियकरसोबत जाण्याच्या आग्रहावर ठाम राहिली. महिलेकडे तिच्या मुलांनाही पाठवण्यात आले पण तिच्या हृदयाला पाझर फुटला नाही.
महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिला रोज मारहाण करतो, त्यामुळे तिने हे पाऊल उचलले.
पोलिसांनी महिलेला नारी निकेतनमध्ये पाठवले
ही महिला प्रियकरसोबत जाण्याच्या आग्रहावर ठाम होती. पतीची व सासरच्या लोकांनी समजावून ती ऐकत नसल्याने अलोट पोलिसांनी महिलेला रतलाम येथील नारी निकेतन येथे पाठवले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.