Crime News : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने हे संबंध संपवण्यास सांगितले होते. मात्र, तिचे प्रेम संबंध सुरूच राहिले आणि पत्नीच्या प्रियकराने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, जि. केज, जि. बीड) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश मिनिनाथ घुले (वय 24, रा. नेरे दत्तवाडी, मूळ रा. टाकळी, जि. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची बहीण अनिता मिनिनाथ घुले (वय 25, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचे अश्विनीसोबत 7 जुलै 2021 रोजी लग्न झाले होते. तो एका भांडीच्या दुकानात काम करत होता. काही वर्षे गावात राहिल्यानंतर जुलै 2022 मध्ये तो पत्नी अश्विनीसह गाव सोडून आई-वडिलांना न सांगता पुण्याला काम करण्यासाठी गेला.
फिर्यादीने भावाला विचारणा केली असता, पत्नीचे अजिंक्य घुलेसोबत प्रेमसंबंध असून तो गावात बदनामी करत असल्याचे सांगितले. जाब विचारल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले.
बदनामी आणि जीवाच्या भीतीपोटी पुण्यात राहायला आल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले होते. तो पुण्यातील स्विगी येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.
गणेश पत्नी सोबत पुण्यात आल्यावर अजिंक्यही पुण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता ते घरी आले. तेव्हा त्याची पत्नी आणि अजिंक्य एकाच खोलीत होते. त्यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली.
अजिंक्य घुले याने मारहाण केली मी तुझ्या पत्नीशी संबंध ठेवीन. तुम्हाला जे करायचे आहे ते कर; एक दिवस मी तुझा काटा काढून तुझ्या बायकोला घेऊन जाईन, अशी धमकी त्याने गणेशाला दिली.
या घटनेची माहिती फिर्यादीला समजताच, त्यांनी अजिंक्य घुले यांना फोन करून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादी पुण्यात आल्या आणि आपली भावजय अश्विनीला सोबत घेऊन मुंबईला गेल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी गणेशला फोन केला असता तो उचलला नाही. गणेशच्या खोलीवर पाहायला गेल्या असता गणेशने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.
त्यानंतर गुरुवारी अंत्यसंस्कारानंतर तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.