गुवाहाटी | आसामच्या नागाव जिल्ह्यात बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीने कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा झालेल्या गोळीबारात तो जखमी झाला.
पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बुधवारी बटाद्रवा पोलिस स्टेशन परिसरातून एका व्यक्तीला मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे आरोपीला बुधवारी रात्री रुग्णालयात नेण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “रुग्णालयात जाताना त्याने सांगितले की, मला थोडी विश्रांती घ्यायची आहे. मात्र वाहनातून खाली उतरताच त्याने आमच्या जवानांना धक्काबुक्की केली आणि पळून जाऊ लागला.
वारंवार चेतावणी देऊनही आरोपीने थांबण्यास नकार दिला तेव्हा पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या त्याच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
धुबरी जिल्ह्यातील अगोमोनी येथे घडलेल्या दुसर्या घटनेत, युनायटेड लिबरेशन ऑफ आसाम (उलफा) च्या माजी कॅडरवर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू होती. गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सांगितले की, “आम्हाला गोळीबार करावा लागला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.”
मे 2021 मध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात एकूण 46 लोक ठार झाले आणि किमान 110 जखमी झाले.