लखनऊ : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
ही घटना उघडकीस आली जेव्हा मुलगी दोन महिन्यांची गरोदर असताना पोटदुखीची तक्रार करू लागली, असे पोलिसांनी सांगितले. ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
काय प्रकरण आहे?
आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार करत होता. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड चाचणी करण्याचा सल्ला दिला.
तपासणीनंतर ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब तिच्या कुटुंबियांना समजताच मोठा धक्का बसला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर वडिलांनी मुलीला याबाबत विचारणा केली असता शेजारी राहणारा व्यक्ती तिच्यावर बलात्कार करत असल्याचे तिने सांगितले.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांसह सर्वांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचेही मुलीने तिच्या पालकांना सांगितले.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या गावात राहणारा एक व्यक्ती अनेक दिवसांपासून मुलीवर अत्याचार करत होता. पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. अल्ट्रासाऊंड चाचणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, 2 महिन्यांचा गर्भ आहे.
या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी मी पोलीस ठाण्यात गेलो असता, ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने माझा पाठलाग केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ठाणे प्रभारींना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’
पोलिस अधीक्षक समर बहादूर म्हणाले, अल्पवयीन मुलीच्या जबानीच्या आधारे अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील 40 वर्षीय व्यक्तीने विविध आमिषे दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. नंतर ती गर्भवती राहिली. कारवाई तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.