औरंगाबाद, 3 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार औरंगाबाद पोलिस राज ठाकरे यांची सभा आणि त्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवून होते.
औरंगाबाद पोलिसांनी या संदर्भात अहवाल तयार केला असून तो अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, 31 जुलै 2017 रोजी सुधारित महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 116, 117 आणि 153 अ, भादंवि 1973 आणि कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंसोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सभेला परवानगी देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक
नुकतीच गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी रजनीश सेठ यांच्यात दुपारी बैठक झाली. बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा अहवाल गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला.
काय म्हणाले पोलीस महासंचालक?
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेबाबत विचारले असता ते म्हणाले, औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त कारवाई करण्यास सक्षम आहेत, आवश्यकता भासल्यास औरंगाबाद पोलिस योग्य ती कारवाई करतील. तपासात नियमभंग केला असेल तर राज ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्यात येईल; अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे.
जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल
संपूर्ण राज्यभरात मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल आहेत. तर चार दिवसाच्या देवदर्शनासाठी वसंत मोरे (Vasant More) बालाजीला रवाना झाले आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
वसंत मोरे (Vasant More) यांना यानंतर शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी ठाण्याच्या सभेत सर्वात आधी भाषण ही केले होते.
वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे सर्वात मोठे नेते मानले जातात. वसंत मोरे आता भोंग्याच्या विरोधात आंदोलनाआधीच बालाजी (Balaji) दर्शनासाठी रवाना झाले आहेत.