Amravati Chemist Murder | अमरावती : अमरावती येथे एका 55 वर्षीय मेडिकल चालकाचा खून झाला. उमेश कोल्हे असे मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी उमेश कोल्हे चा खून नूपूर शर्माबद्दल सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास अमरावती पोलीस करत असल्याचे डीसीपी विक्रम साळी यांनी सांगितले.
उमेश कोल्हे (रा. घनश्यामनगर) याची शहरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना 21 जून रोजी घडली. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हत्येमागचा हेतू स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत.
उमेश कोल्हेने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती का? याचाही तपास केला असता प्राथमिक स्वरूपात तरी या हत्येचा नुपूर शर्मा प्रकाराशी संबंध असल्याचे तपासात उघड झाल्याचे उपायुक्त साळी यांनी सांगितले.
काय प्रकरण आहे?
उमेश कोल्हे (रा. घनश्यामनगर) याची शहरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना 21 जून रोजी घडली. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर आहे.
त्यांनी मंगळवारी रात्री मेडिकल स्टोअर बंद केले. त्यानंतर मुलगा संकेत (27) आणि सून वैष्णवीसह ते घरी गेले. समोरून उमेश एका दुचाकीवर तर त्याचा मुलगा संकेत व पत्नी वैष्णवी हे मागून दुसऱ्या दुचाकीवर जात होते.
न्यू हायस्कूल मुख्यासमोरील रस्त्यावरून जात असताना दुचाकीजवळ तिघेजण उभे होते. त्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.
तिघांपैकी एकाने त्याच्या मानेवर वार केले
त्यामुळे उमेशने दुचाकी थांबवली. तो काही कळण्यापूर्वीच तिघांपैकी एकाने उमेशच्या गळ्यावर वार केले, तर इतरांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उमेश दुचाकीसह खाली पडला.
हा प्रकार त्यांचा मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिघेही मारेकरी दोन दुचाकीवरून पळून गेले.
त्यानंतर संकेत आणि वैष्णवी यांनी स्थानिकांच्या मदतीने उमेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारानंतर काही वेळातच उमेशचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांना देण्यात आली.
याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24, रा. बिस्मिल्लानगर) आणि शोएब खान उर्फ भुर्या वल्द साबीर खान (22, रा. यास्मिननगर) यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे यांनी एएनआयला सांगितले की, त्यांना कधीही धमक्या आल्या नाहीत. त्याचा मोबाईल पोलिसांच्या जवळ असल्याने आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही.
आम्हाला कोणावरही शंका नाही. पोलिस तपासात सुरुवातीला 2 ते 4 जणांना अटक केल्याचे सांगण्यात आले. एका स्थानिक वृत्तपत्रात या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.