US killed al-Qaeda Chief al-Zawahiri | अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

US killed al-Qaeda chief al-Zawahiri : अमेरिकेने दहशतवादाला सर्वात मोठा धक्का दिला असून सीआयएने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला (Who was Ayman al-Zawahiri) ड्रोन हल्ल्यात ठार मारले आहे.

खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अल जवाहिरीच्या मृत्यूची बातमी संपूर्ण जगाला दिली आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलताना जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, जवाहिरीच्या खात्म्याने अल कायदाचे नेटवर्क देखील कमकुवत होईल.

अल-जवाहिरीला ठार मारण्याच्या या यशस्वी कारवाईत कुठल्याही प्रकारे नागरिकांची जीवितहानी झाली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात जवाहिरीला केले ठार

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अमेरिकेच्या सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला.

अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश होते. अल-जवाहिरीच्या डोक्यावर अमेरिकेने $25 दशलक्ष म्हणजेच सुमारे दोन अब्ज रुपयांची घोषणा केली होती.

बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते.

अल-जवाहिरीचा जन्म 1957 मध्ये झाला

अयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1957 रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन, अल-जवाहिरीला अरबी आणि फ्रेंच भाषा अवगत होती.

जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही अतिरेकी संघटना होती.  इस्लामिक राजवट कायम ठेवणे हा त्यांचा हेतू होता.

जवाहिरी बिन लादेनशी कसा जोडला गेला?

अल-जवाहिरीने ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियात भेट घेतली होती. ओसामा बिन लादेन 1985 मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता.

यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता आणि इथूनच या दोनीही दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले.

लादेन-जवाहिरीने जगाला धक्का देण्याचा कट रचला

2001 मध्ये, अल-जवाहिरीने EIJ चे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला.

अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले आणि 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला. 9/11 च्या हल्ल्यापासून अमेरिका अल-जवाहिरीचा शोध घेत होती.