Crime News : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने दोन वर्षांपूर्वी मंदिरात एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले.
त्यानंतर कायदेशीर पद्धतीने लग्न करू, असे सांगून त्याने तिला घरी पाठवले. दरम्यान, तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र आता तरुणाने बाळाला आणि तरुणीला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
त्यामुळे पीडितेने गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि. 21) रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तरुणाने 2020 मध्ये नागपुरातील शिवमंदिरात तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघेही एकत्र राहू लागले. काही दिवस तरुणाच्या कुटुंबीयांनीही तिला सून असल्याचे भासवून घरात डांबून ठेवले.
त्यावेळी या तरुणाने सुमारे महिनाभर तरुणीवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने युवतीला सांगितले की, आम्ही लवकरच कायदेशीररित्या लग्न करू, मात्र तोपर्यंत तू घरीच रहा. त्यामुळे तरुणी घरी आली.
काही दिवसांनी तरुणाने तिला अमरावती आणि बडोदा येथे नेऊन पुन्हा तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ही मुलगी गरोदर राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला.
मात्र आता तरुण आणि त्याचे नातेवाईक या बाळाला स्वीकारायला तयार नाहीत. एवढेच नाही तर तरुण, त्याचे नातेवाईक व उपसरपंच रोशन रमेश बहिरमकर यांनी पैसे घे अन्यथा गायब करू, अशी धमकी दिली.
या घटनेमुळे पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तिच्या पतीसह तिचे चार नातेवाईक आणि उपसरपंच रोशन अहिरेकर यांच्याविरुद्ध बलात्कार, विश्वासघात, धमकावणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.