आजची कविता : स्वप्नझुला
******
अंतरातली कौतुके
ओघवती झरत
दृष्टीच्या येरझाऱ्या
पुनःपुन्हा अंतरात
मन प्रकृतीचे बिंब
आयन्यात रंग तरंगती
तरल गीते सुरेलशी
शीळ घालत येती
दूर टेकडीचा कडा
वाकलेले झाड तपस्वी
शांतलेली सांज तरीही
भगवी वस्त्रे सजवी
दीप ऊजळवते रात्र
चंद्रकोर पश्चिमेची
एक एक चांदणीची
निशा नृत्ये भुलवती
पापणीत झुलणारे
स्वप्नझुले लयेवर
निद्रेत विहरणारे
मन माझे अलवार
****