पुणे, 19 मार्च : पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका 11 वर्षीय मुलीसोबत तिचे वडील, लहान भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने अमानुषतेच्या साऱ्या सीमा पार केल्या आहेत.
नराधम आरोपीनी पीडित मुलीला वेळोवेळी धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोरेगाव पार्क येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत समुपदेशकाला सांगितले आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय समुपदेशकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी पीडितेचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा आणि चुलत मामाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अत्याचाराची ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसही हैराण झाले आहेत. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून घटनेचा सखोल तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय पीडित मुलगी पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. फिर्यादी महिला समुपदेशक म्हणून काम करते.
घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला अल्पवयीन मुलींना ‘गुड टच आणि बॅड टच’ समजावून सांगण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, समुपदेशन देताना शाळेतील एका अकरा वर्षीय मुलीने फिर्यादीला सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर अत्याचार होत आहेत.
फिर्यादी महिलेने पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर समुपदेशकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती 2017 मध्ये बिहारमध्ये असताना, घरात कोणी नसताना तिच्या वडिलांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
पीडितेच्या 14 वर्षीय भावाने नोव्हेंबर 2020 मध्ये ती ताडीवाला रोड येथे राहात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने अनेकदा पीडितेला धमकावून अत्याचार केला.
इतकेच नाही तर जानेवारी 2021 मध्ये तिचे आजोबा आणि मे 2021 मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले.
बंडगार्डन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करीत आहेत.