परिसंवाद : मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्री वादात अडकले आहे का?
उदगीर : मराठी लेखिकांचे साहित्य स्त्रीवादात अडकलेले नाही. स्त्रिया लिहीत आहेत ते त्यांच्या अनुभवातून, जगण्यातून. यासोबतच त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या प्रश्नावर. त्या विविध साहित्यप्रकार मांडत आहेत.
बाईचं जगणं दुय्यमत्वावर आधारलेलं आहे. अजूनही ती मुक्त झालेली नाही, तिला मुक्त करायचे असेल तर तिला सामाजिक चौकटीतून मुक्त केले पाहिजे. त्यासोबतच पुरुषांनादेखील त्यांच्या पुरुषी चौकटीतून मुक्त केले पाहिजे. त्या नंतरच आपल्याला स्त्री-पुरुष समानता आणता येईल.
त्यामुळे मराठी लेखिकांचे साहित्य स्त्रीवादात अडकले आहे, असे म्हणणे अन्यायकारक होईल असे मत कवयित्री, लेखिका नीरजा यांनी व्यक्त केले.
मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्री वादात अडकले आहे का? या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. लोकनेते विलासराव देशमुख सभागृह येथे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
या परिसंवादात कवयित्री आणि लेखिका नीरजा तसेच स्वाती दामोदरे, शुभदा चौकर, रमेश शिंदे आदी साहित्यिक सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप धोंडगे होते. समन्वयक डॉ. बी. एस. भुकतरे यांनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रकाश तोंडारे, नाथराव बडे, प्रा. डॉ. संगीता तुपे, प्रशांत पेन्सलवार, चंद्रशेखर चवंगे आदी उपस्थित होते.
स्त्रीने स्त्रीला समजून घेऊन घातलेली साद आहे. तर स्त्रीवाद ही संयमी सुरात मानवतेला दिलेली हाक आहे. स्त्रीवाद लोकशाहीला समांतर विचार आहे. लेखिकांचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे असे म्हणणे अन्याकारक होईल असे मत स्वाती दामोदरे यांनी व्यक्त केले.
भ्रमिष्टावस्था दूर करण्याची जबाबदारी लेखकांनी पार पाडावी : राजन गवस यांची अपेक्षा
स्त्रीवाद रुजतोय आणि प्रवाही होतोय. विविध साहित्यप्रकारातून स्त्रीवादावर मांडणी करण्यात आली आहे. कथा-कविता आत्मचरित्र इत्यादी सर्व प्रकारातून यावर भाष्य करण्यात आले आहे, असे मत रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.
समजूतदार स्त्रीवाद डोकावू लागला आहे जो निर्व्याज असून तो बेगडी नाही.
आरक्षणामुळे ज्या स्त्रियांना संधी मिळाली त्यांनी आपल्या क्षेत्रात कायापालट केला. यासोबतच पडद्यावर दाखवण्यात येणारी स्त्रीदेखील समोरच्यांना विचार करायला लावते, अशी दाखवण्यात आली आहे. तरतरीत, कर्तृत्ववान आणि समानता वाद पेरणाऱ्या स्त्रिया पडद्यावर दाखविण्यात आल्या आहेत, असे मत शुभदा चौकर यांनी व्यक्त केले.