अध्यक्षीय मनोगत | भ्रमीत समाजात ‘चतुरमौन’ : भारत सासणे

Presidential Psychology | ‘Chaturmaun’ in a confused society: Sasane Bharat

उदगीर : अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे.

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा उच्चार करणे हे जसे आज गरजेचे आहे त्याचप्रमाणे सत्य निर्भयपणे सांगितले गेले पाहिजे हीदेखील काळाची गरज आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जात आहे.

सिनेमा तुमचा आणि आमचा असे सांगून कला विभाजित केली जात आहे. तर दुसरीकडे सरस्वतीचे उपासक दु:खी होत आहेत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चालली आहे. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे; सर्वत्र चतुर मौन पसरले आहे, असे मत 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी आज व्यक्त केले.

छत्रपती शाहू महाराज सभागृहातील डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावरून भारत सासणे यांनी अधक्षीय मनोगत व्यक्त केले. सध्याचा काळ, मराठी साहित्याचा हरविलेला चेहरा, साहित्याच्या अभिरूचीला मारक ठरू पाहणारा तुच्छतावाद, संविधानाला अनुसरून भारत घडविला गेला आहे का, सर्वसामान्य माणसाला खरोखच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, बुद्धिवादाची होत असलेली टिंगल, विभाजनवाद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सासणे यांनी कलात्मक आणि रूपात्मक पद्धतीने मांडणी करून संयमतेने परामर्श घेतला आहे.

लेखकाने निर्भयपणे सत्य सांगावे ही काळाची गरज !

काळ तर मोठा कठीण आला आहे असा निर्देश करून साहित्यसंमेलनाध्यक्ष म्हणतात, ‘काळा’ने आपल्याला बोटाला धरून वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणले. यंत्रयुग, तंत्रयुग, अणूयुग आणि अवकाशयुग आपण अनुभवले आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित, संमोहित झाला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरविली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित असते.

निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्याने आपण अस्वस्थ आहोत असे विधान प्रतिभावंत कलावंत करताना दिसतात; मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचे उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मला देखील हा प्रश्न विचारला गेला आहे.

एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळं निर्माण होतात, तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्म्स, निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अवस्थ असण्याचे हे एक कारण आहे.

प्रतिभावंत कलावंत स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणार्‍यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करते. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वत:ला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात, म्हणून स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचे आकर्षण वाटत राहते.

आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा आणि हुंकार हरवला आहे!

वृत्तीगांभीर्याने लेखन करणार्‍या चिंतनशील लेखकाला साहित्यांर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबतसुद्धा काहीएक चिंतन मांडावे लागते आणि काहीएक चिंता व्यक्त कराव्या लागतात. या चिंता प्रातिनिधीक स्वरूपात रसिकजाणकारांसमोर मांडताना भारत सासणे म्हणतात, आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे.

काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलिकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे.

साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटाली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिले पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावे लागेल.

सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. त्याला परिवर्तन हवे आहे. शोषणमुक्त समाज हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणे नको आहे. पण आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेले नाही.

कोणीतरी मसिहा येईल आणि आपली परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असे त्याला वाटत आहे. पण असा कोणी मसिहा येत नाही आणि त्याचे वाट पाहणे थांबत नाही. सर्वसामान्य माणसाच्या नशिबी केवळ वाट पाहणे आहे. तो भयभीत आहे, त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहत आहोत.

साहित्याच्या परिघात एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झाला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. परप्रकाशित, परभ्रुत आणि इतरांच्या प्रभावळीतील सामान्यवकूब असलेले अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथीत तुच्छतावाद आणि प्रदुषण पसरवित राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल.

या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरूचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमान देखील होतो याची सहसा दखल घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून आपण मराठी साहित्याचे काही नुकसान करतो आहे याची त्या अनुयायांना जाणीव नसते, कारण त्यांच्या ठायी काही बौद्धिक विकृती निर्माण झालेली असते.

मराठी साहित्यातून अद्भुतरस हद्दपार!

मराठी साहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेले, निरस असे झाल्याचे दिसते आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या यांना कुलूपबंद तळघरात ढकलून दिले आहे.

संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भुतरसाचे सेवन ज्या मुलांना करता येते ती मुले बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तिची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात, असे बालमानसशास्त्र सांगत आलेले आहे. त्या उलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुले पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी आणि अरसिक अशी निपजतात.

एखादा समाज किंवा संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट केली पाहिजे हा दुष्ट विचार इतिहासकालापासून सर्वत्र आढळतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतीची ग्रंथालये नष्ट केली आहेत. आपण मात्र स्वत:च आपली ग्रंथालये स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिळी करून टाकली आहेत, या बाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे.

मराठी साहित्य संशोधनातील आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा कसे याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार नसला, तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की, परदेशामध्ये शेक्सपिअर इत्यादी लेखकांची हस्तलिखिते जपून ठेवणे शक्य असेल तर आपण आपल्या ‘मास्टर स्टोरीटेलर्स’ची हस्तलिखिते आणि हस्ताक्षरे का जपून ठेऊ शकलो नाही, असा प्रश्न करून सासणे पुढे म्हणतात या एकूण उदासिनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोलले पाहिजे.

काही टीकाकारांनी असे दाखवून दिले आहे की, मराठी साहित्याचे विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारे असे राहिले आहे. वर्तमानाचे भान नसणे हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घटना अलिकडे घडल्या त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल आहे. साहित्य आपल्या द्रष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असते, ही साहित्याची शक्ती होय.

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काही एक करूणा वाटते काय हा प्रश्न जुनाच आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागते. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असे लिखाण आलेले नसून समाजातला दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही, या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

साहित्याअंतर्गत भाषेचे काही प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांर्गत या घटनेचे पडसाद बहुदा पडलेले नाहीत.

आजच्या भ्रमयुगात उच्चरवाने आणि निर्भयपणे सत्य कथन केले पाहिजे!

विभाजनवादी छद्मबुद्धीच्या शक्तींचे समाजावर नियंत्रण!

भ्रमयुगाबाबत, फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत विस्ताराने सांगताना संमेलनाध्यक्ष भारत सासणे म्हणाले, आपण छद्मबुद्धी विद्ध्वंसकांच्या ताब्यामध्ये जात आहोत असे संकेत मिळायला लागले आहेत. हे विद्ध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातात कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे.

आपण थाळी वाजविली आणि ती वाजविताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजविण्याचे भीषण संदर्भ खरेतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहिती नाहीत. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जातो आहे. कला विभाजित झाली आहे.

सर्वत्र उपद्रव आणि उन्मादाचा उच्छाद मांडला आहे. सर्वत्र दडे बसविणारी शांतता आहे, कोणीच बोलत नाही, कोणीच हरकत घेत नाही, सर्वत्र चतुर मौन पसरले आहे. या मौनात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, हिशोब आणि व्यवहार देखील आहे. याच बरोबरीने सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणे आहे, भीती, दहशत, प्रलोभने आणि विनाशदेखील आहे.

काही विचारवंत आता दबल्या आवाजात असे सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होत आहेत, श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होत आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जात आहे. दरी वाढते आहे.

कदाचित पुढे जाऊन आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. लेखकाने सत्य बोलले पाहिजे आणि निर्भयतने बोलले पाहिजे असेही साहित्य सांगते. सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितले पाहिजे ही देखील काळाची गरज आहे.

मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो याबाबत लेखकाने आपल्याला काही एक सांगून ठेवले आहे. सत्य आपले कथन उच्चारित राहत असते. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. तसेच कोलाहलात हा आवाज उच्चरवाने देखील उच्चारला गेला पाहिजे, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असे सांगत राहतो. आपण पाहिले, ऐकले पाहिजे हे मात्र खरे.

काही निर्बुद्ध उपासक छद्मरूपाने समाजाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपी उपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत. त्यांना सूड उगवायचा आहे. कधी ते संस्कृतीरक्षक होतात, कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात, कधी ते ज्योतिषी होतात, कधी ते भाष्यकार होतात तर कधी राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. याचे कारण ते आधीच विकले गेलेले आहेत.

श्रेयासाठी सतत चालेल्या लढाईकडे बघून सामान्य माणसाची स्थिती उद्याची पहाट सुंदर असेल या आश्वासनांवर विश्वास ठेवायला नको म्हणते आहे. कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. सामान्य माणसाच्या या परिस्थितीकडे लेखक फक्त हताशतेने पाहतो आहे.

लेखकाला भोवताल अस्वस्थ करतो आहे. लेखक बघतो आहे, पाहतो आहे आणि समजून घेतो आहे, त्याला जाणवते आहे, तो सहकंपित होतो आहे. जीवनाची एकात्मता साहित्याला अंकित करीत असते आणि साहित्याच्या परिघात सर्वदूर पसरलेला आणि मातीशी इमान राखणारा सामान्य माणूस समाविष्ट असतो. त्यामुळे साहित्य सामान्यांबद्दल आस्था बाळगून असते, त्यांची वेदना समजून घेणारे असते, त्यांच्याशी जोडणारेही असते.

बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामत: बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचे पूजन तो पाहतो आहे. राज्यकर्त्यांच्या हाताला पैसे मोजून घट्टे पडतात आणि त्यामुळे हळूवार स्पर्श समजेनासा होतो असे काही झाले आहे का, असे लेखक स्वत:ला विचारत आहे. याच बरोबरीने हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरे किंवा त्यांचे मौनात जाणेदेखील तो पाहतो आहे.

एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असे काहीसे कुणीतरी म्हणते आहे. लेखकाला मात्र यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाही तर विचारपूर्वक केलेले चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही ते धर्मही नाहीत असेलच तर पंथ आहेत असेही कुणीतरी म्हणतो आहे. हे सर्व ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक मात्र व्याख्या इत्यादीच्या घोटाळ्यात पडत नाही. त्याला बगलेमध्ये लपविलेली सुरी नेमकी दिसत आहे.

तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणे त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपाय देखील नाही. आशावादी असणे ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणे या व्यतिरिक्त तो दुसरे काय करू शकतो?