जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील मंजूर कामांना स्थगिती, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थगितीची केली होती मागणी

138
Postponement of approved works in the meeting of District Planning Committee, Min. Prataprao Patil Chikhlikar had demanded adjournment

कंधार प्रतिनिधी (प्रभाकर पांडे) : राज्यात राजकीय अस्थिरता असताना शासनाच्या तिजोरीवर डोळा ठेवून अत्यंत घाईघाईने नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कोट्यावधी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ज्या कामाला मंजुरी देण्यात आली आणि जी तरतूद करण्यात आली त्या कामांना आणि त्या तरतुदीस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

खा. चिखलीकर यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नांदेड डीपीडीसीत घेण्यात आलेल्या बैठकीच्या मंजुरीला तूर्तास स्थगिती दिली आहे.

नव्या पालकमंत्र्याची नियुक्ती होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीतच डीपीडीसीच्या कामांना आणि तरतुदींना मंजुरी द्यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

त्यामुळे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घाई गडबडीत उरकलेल्या डीपीडीसीच्या बैठकीवर अखेर स्थागिती मिळाली आहे.

जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनांसाठी मार्च 2022 अखेर एकुण 567.8 कोटी रुपयाची तरतूद मंजूर होती.

या मंजूर तरतुदीपैकी 567.8 कोटी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी 566.51 कोटी विविध विकास योजनेअंतर्गत पुनर्विनियोजनाने सुधारित तरतुदीनुसार विकास कामांवर खर्च झाले.

या खर्चास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात होती.

जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनेसाठी 355 कोटी तरतूद मंजूर होती. यापैकी मार्च 2022 अखेर पर्यंत 354 कोटी 47 लाख 90 हजार खर्च झाले. खर्चाचे हे प्रमाण 99.85 टक्के एवढे आहे.

अनुसूचित जाती उपयोजनासाठी 163 कोटी रुपये मंजूर होते. यातील 162 कोटी 95 लाख एवढा निधी खर्च झाला. आदिवासी उपयोजनेमध्ये 49 कोटी 7 लाख 97 हजार एवढी तरतूद मंजूर होती.

हा संपूर्ण निधी विकास कामांवर खर्च झाला असे सांगण्यात आले. मार्च 2022 अखेर पर्यंत एकुण 566 कोटी 50 लाख 87 हजार एवढा निधी खर्च झाला असेही नमूद करण्यात आले होते.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी 400 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद झाली आहे. त्यापैकी 83 कोटी 99 लक्ष रुपये प्राप्त झाले आहेत.

सन 2021-22 चे विविध विकास कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी 102 कोटी रुपये द्यावेत असे अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.केवळ निधीवर डोळा ठेऊन हा कारभार करण्यात आला होता.

त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या 29 जून रोजी झालेल्या बैठकीतील सर्व मंजूर कामांना आणि प्रस्तावांना स्थगिती देण्यात यावी.

नव्या सरकारच्या आणि नव्या पालकमंत्र्याच्या नियुक्तीनंतर आणि नूतन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालीच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन कामाला मंजुरी द्यावी आणि उर्वरित विकास कामे करावीत अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या सर्व निर्णयाला आणि कामाच्या मंजुरीला स्थगिती देत असल्याचे आज आदेश काढले आहेत.