पाळीव कुत्र्याने लिफ्टमध्ये मुलाचा घेतला चावा, मुलगा रडत राहिला पण मालकिणीने दुर्लक्ष केले; गुन्हा दाखल

0
22
Pet Dog Bites Boy in Elevator, Boy Continues to Cry But Mistress Ignores; Filed a case

Crime News : देशात अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात कुत्र्यांने हल्ला करून आजूबाजूच्या लोकांना जखमी केले आहे. गाझियाबादमधून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

येथे लिफ्टमध्ये जाणाऱ्या एका मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे वेदनेने मूल रडतच राहिले पण त्या महिलेने त्या चिमुरड्याकडे चक्क दुर्लक्ष करीत शांतपणे आपल्या कुत्र्यासोबत लिफ्टमधून बाहेर पडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार्म्स काउंटी सोसायटीचे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाजियाबादच्या राजनगर एक्स्टेंशनच्या चार्म्स काउंटी सोसायटीचे आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. 9 वर्षीय मुलगा हा इयत्ता चौथीत शिकत असून, घटना घडली त्यावेळी तो शिकवणीवरून घरी परतत होता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालक लिफ्टमधून जाताना दिसत आहे आणि एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत उभी आहे.

कुत्र्याला दिसू नये म्हणून जेव्हा मुल लिफ्टमध्ये पुढे जाते, तेव्हा कुत्रा मुलावर अचानक हल्ला करून त्याच्या कमरेच्या खालच्या भागात चावतो. यादरम्यान महिला निवांतपणे उभी असलेली दिसते.

वेदनेने रडत आणि लंगडत होता

याच व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, मुलगा जखमेला धरून रडत आहे. वाढत्या वेदनांमुळे त्याला पाय जमिनीवर ठेवताही येत नव्हते.

तो लंगडतो पण ती महिला एक मिनिटही पुढे येत नाही आणि त्याची विचारपूस करीत नाही. मुलाने घरी जाऊन हा संपूर्ण प्रकार आईला सांगितला.

या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी चार्म्स काउंटी सोसायटीत राहणाऱ्या महिलेशी बोलले पण ती काहीही न ऐकता घराकडे निघून गेली.

महिलेविरुद्ध पालकांची तक्रार

या संपूर्ण प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणी केली.

कुत्र्याच्या मालकावर आरोप आहे की त्यांनी या घटनेनंतर मुलाला वाचविण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा चौकशी केली नाही, परंतु ती शांतपणे मुलाला वेदनांनी रडताना पहात राहिली.