मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात सर्व प्रमुख पदाधिकारी, खासदार आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
आम्ही 19 जिल्ह्यांचा दौरा करणार असून, भाजपकडून शिवसेनेबाबत पसरवलेले गैरसमज, त्यांनी आमच्याबद्दल पेरलेले विष, आमच्या विरुद्ध सुरु असलेली कारस्थाने या सगळ्यांना उत्तर दिले जाईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी होती आणि राहील, शिवसेनेच्या हिंदुत्वात भेसळ नाही. आम्हाला जनाबसेना म्हणणाऱ्यांनी इतिहास आणि कर्तव्य तपासून पाहावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
काश्मीरच्या संदर्भात आज आपल्याला अक्कल शिकवणाऱ्यांनी काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले.
मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत कोणी सरकार स्थापन केले, ते पाकिस्तानी धार्जिणेआहेत, ते फुटीरतावादी आहेत, असे आम्हीच ओरडून सांगत आहोत.
त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू नका हे त्यांना सांगत होतो, सोबतच या देशातील हुतात्म्यांचा, काश्मीरी पंडितांच्या बलिदानाचा अपमान करू नका.
त्यामुळे जनाबसेना कोण आहे, आता काय चालले आहे, एमआयएमची महाविकास आघाडीला युतीची ऑफर, हे सारे भारतीय जनता पक्षाचे डावपेच आहेत, हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहोत. हे भाजपचे षडयंत्र आहे.
एमआयएम आणि भाजपची आतून मिलीभगत आहे, हे छुपे रुस्तम आहेत. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने त्यांना आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील एमआयएम नेते ऑफर देत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना एमआयएमसोबत कधीच जाणार नाही, औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या पक्षासोबत शिवसेना संबंध कधीच ठेवणार नाही. एमआयएमकडून आलेली ऑफर भाजपच्या कारस्थानाचा भाग असल्याचे संजय राऊत म्हणाले.