Raj Thackeray Press Conference in Pune | पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘१ मे महाराष्ट्र दिनी मी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे’, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यावरून आक्रमक इशारा दिला आहे.
‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक प्रश्न आहे. लाऊडस्पीकरचा त्रास फक्त हिंदूंनाच होत नाही तर सर्वांनाच त्याचा त्रास होतो.
त्यामुळे 3 मे पर्यंत मशिदीवरील लाऊडस्पीकर खाली न आल्यास देशभरातील हिंदू बांधवांनी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी.
आम्हाला देशात कोणत्याही प्रकारची दंगल नको आहे, त्यामुळे शांततेत लाऊडस्पीकर वाजवा, अन्यथा मशिदीसमोर दिवसातून पाचवेळा हनुमान चालीसा वाजवू,’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मिरवणुकांवर दगडफेकीचा इशारा
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांमध्ये देशाच्या काही भागात हिंसक घटना घडल्या. या घटनांबाबत राज ठाकरेंनी इशाराही दिला आहे. ‘आमच्या तरुणांना हातात शस्त्र घ्यावे लागेल अशी जबरदस्ती करू नका. आमच्या मिरवणुकांवर होणारे हल्ले थांबवले नाहीत तर आम्हीही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ,’ असं राज ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलणे टाळले
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू ओवेसी’ म्हणत त्यांचा समाचार घेतला होता. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता, ‘मी आता पुन्हा लवंड्यांवर बोलू इच्छित नाही.’ असे उत्तर दिले.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आपण मागे हटणार नसल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले असून, त्यामुळे नजीकच्या काळात मनसे आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.