उदगीर (भारतरत्न स्वसम्राज्ञी लता मंगेशकर सहित्यनगरी) : मराठी-कन्नड-तेलुगू आणि उर्दू या सर्व भाषा वरकरणी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी या सर्व भारतीय भाषाच असून त्यांचे भाषिक आणि सांस्कृतिक गोत्र एकच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादामध्ये मांडण्यात आले.
९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपीठ येथे आयोजित ‘मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू यांचा भाषिक व सांस्कतिक अनुबंध’ या विषयावरील परिसंवादात हे मत मांडण्यात आले.
ज्येष्ठ लेखक प्रकाश भातंब्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मोहिब कादरी म्हणाले की, उर्दूचा जन्म याच भारतीय मातीत झाला आहे. त्यामुळे ती अस्सल भारतीय भाषा आहे.
हिंदी आणि उर्दू बहिणी-बहिणी आहेत, तर मराठी आणि उर्दू या मावस बहिणीसारख्या एकाच कुटुंबातील भाषा आहेत. उर्दू भाषेमध्ये अनेक भारतीय भाषांचे मिश्रण आहे. पारसीतून उर्दूमध्ये आणि उर्दूतुन मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत.
तुघलकने दिल्लीतून मराठवाड्यात आपली राजधानी आणली आणि आपला निर्णय चुकला म्हणून पुन्हा दोन वर्षात दिल्लीला राजधानी हलवली. पण त्याच्यासोबत आलेले लोक इथेच थांबले. त्यामुळे दक्षिणेत उर्दूचा प्रवेश झाला. उदगीर हे तर मराठी, कानडी, तेलुगू, उर्दू या सर्व भाषांची मने जुळविण्याचे काम करते.
संगणक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्लिका धनंजय कालकोंडा यांनी पसायदान सादर करून आपल्या मनोगताला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, तेलगू हे माझं सासर आहे तर मराठी हे माझं माहेर आहे. या दोन्ही बोलीभाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार सारखेच आहेत, असे सांगून त्यांनी काही उदाहरणे ही यावेळी दिली.
बालकुमार नटले साहित्यिकांच्या वेशभूषेत; बालकुमार मेळ्याचे अनोख्या पद्धतीने झाले उद्घाटन
डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी-कानडी संस्कृतीतील समानता उलगडून सांगितली. ते म्हणाले, मराठी भाषेची सुरुवात कानडी संस्कृतीतून झाल्याचे मानले जाते. मराठी भाषेचा सर्वात प्राचीन शीलालेख कर्नाटकात आहे. विठ्ठल हा कानडी आणि मराठी संत परंपरेला जोडणारा दुवा आहे. दोन्ही भाषिक परंपरेतही खूप समानता आहे. उदगीरसारख्या चार भाषेचा संगम घडवणाऱ्या ठिकाणी या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाला त्यामुळे महत्त्व आहे.
कन्नड भाषा अकादमी पुरस्कारविजेते विठ्ठल सदाशिव माळी म्हणाले की, कानडी-मराठी भाषेचा अनुबंध खूप जुना आहे. या दोन्ही भाषिकांमध्ये असलेला सीमावाद हा राजकीय असून तो सांस्कृतिक नाही. मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात कानडीमध्ये भाषांतरित केले जाते. त्याचे प्रवेशद्वार बेळगाव आहे. मराठी कानडी सांस्कृतिक अनुबंध खूप जुने आहेत.
हिंदीतील साहित्याचे मराठीत अनुवाद करणारे चंद्रकांत भोंजाळ यांनी मराठी आणि कानडी भाषेतील साम्ये उदाहरणांसह दाखवून दिले. दोन्ही भाषेतील भक्ती संप्रदायातील समानता त्यांनी उलगडून सांगितली.
परिसंवादाचा समारोप करताना प्रकाश भांतब्रेकर यांनी मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यादव सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.