मुंबई : राज्यात सध्या लोडशेडिंगची टांगती तलवार असल्याने वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. वीज टंचाईनुसार केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे.
परिणामी अनेकांच्या उद्योग धंद्यावर लोडशेडींगचे संकट घोंगावत आहे. राज्यातील लोडशेडिंगचे संकट टाळण्यासाठी कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड (CGPL) कडून 760 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.
15 जूनपर्यंत अल्प मुदतीच्या वीज खरेदी कराराद्वारे वीज खरेदी करण्याचा निर्णय वीज विभागाने घेतला आहे. राज्यात विजेचा तुटवडा असला, तरी वीज खरेदी करून आम्ही कोणत्याही परिस्थितीत राज्यात लोडशेडिंग होऊ देणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे भविष्यात त्याचा परिणाम होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुठे किती कोळसा उपलब्ध?
वीज निर्मिती केंद्र दिवसासाठी उपलब्ध साठा
- कोराडी (1980MW) 1.09
- कोराडी (210MW ) 4.13
- नाशिक (420MW) 3.20
- भुसावळ (1210MW) 2.15
- परळी (750MW) 1.65
- पारस (500MW) 3.66
- चंद्रपूर (2920MW) 7.52
- खापरखेडा (1340MW) 7.40
मुख्यमंत्री-महसूल मंत्री यांचे आभार
राज्यातील वीजटंचाई आणि लोडशेडिंगचे संकट लक्षात घेऊन खासगी वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यासाठी महावितरणला अधिकार देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.
राज्याला वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि ऊर्जामंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
वीज खरेदी करार करण्यासाठी महावितरणला मंत्रीमंडळाकडे येण्याची गरज नाही, हा निर्णय महावितरणच्या पातळीवर घेता येईल, ही मुभा राज्य सरकारने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने विजेच्या तुटवड्यावर वेगाने मात करण्यासाठी आम्हाला तातडीने निर्णय घेणे शक्य होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात उष्णतेची लाट एवढी तीव्र आहे की, उष्मा वाढत आहे. दुसरीकडे कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. विशेष म्हणजे कोळशाचा साठा उपलब्ध झाला, तरीही रेल्वेचे रॅकही उपलब्ध नाहीत.
आगामी मान्सूनसाठी कोळशाचा साठा ठेवावा लागणार आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने राज्यातील सर्व उद्योग व व्यावसायिक आस्थापने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे आणीबाणी निर्माण झाली असल्याचे राऊत यांनी म्हटले.