Latur News | फरार आरोपीला मदत, औरादचे प्राचार्य अटकेत

Latur News

Latur News | चाकूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड याला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते.

मात्र, तो सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता. अखेर लातूर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.

त्यावेळी त्याचा मित्र, औराद शहाजानी येथील प्राचार्य अजितसिंह रघुवीरसिंह गहेरवार यांनी त्याला आश्रय दिला आणि त्याला वेळोवेळी मदत केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून आज पोलिसांनी थेट प्राचार्यालाच अटक केली.

चाकूर येथील खुनाचा गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड फरार होता. फरार असलेल्या कालावधीत त्याचा मित्र अहमदपूर येथील मूळ रहिवासी आणि औराद शहाजानी येथील महाविद्यालयाचा प्राचार्य अजितसिंह रघुवीरसिंह गहेरवार यांनी आरोपीला औराद येथील घरी आश्रय दिला.

तसेच स्वत:ची कार वापरण्यास देऊन आरोपीला सर्व प्रकारची मदत सुरू होती, अशी गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवार, दि. ३ जून रोजी प्राचार्य अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार (४५, व्यवसाय नोकरी, प्राचार्य, रा. कुमठा, ता. अहमदपूर) यांना औराद शहाजानी येथे अटक करण्यात आली. या संदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते हे करीत आहेत