नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या महिलेला पारडी पोलिसांनी अटक केली.
वडिलांची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेला तिच्या मुलीनेही मदत केली, हे विशेष.
धर्मेंद्र नरेश गजभिये (वय ४०) असे मृताचे नाव आहे. २० वर्षांपूर्वी त्याचे निशा (वय ३६) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना १७ वर्षांची मुलगी आहे. गजभिये ट्रक ड्रायव्हर होता.
त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो वाहन घेऊन नेहमी बाहेरगावी जायचा. त्यामुळे पाच ते सात दिवसांनंतर घरी परत यायचा.
दरम्यान, त्याच्या पत्नीने दुसरीकडे सूत जुळविल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे पाच वर्षांपासून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे.
आपल्या मागे पत्नी भलतेच काम करते, असा संशय असल्याने गजभियेने घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले होते. त्यातील फुटेज तो नेहमी चेक करायचा अन् नंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण व्हायचे.
११ एप्रिलच्या रात्री असेच झाले. पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. दोघांनीही एकमेकांना जबर मारहाण केली. यावेळी नशेत असलेल्या गजभियेवर पत्नी निशा हावी झाली.
तिने मुलीच्या मदतीने खाली पाडले. त्याच्या छातीवर लाथ ठेवली अन् गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला.
एका बाजूने मुलगी अन् दुसऱ्या बाजूने निशाने हा फास आवळून गजभियेला ठार मारले. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्येचा कांगावा केला.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि चाैकशी सुरू केली.
दरम्यान, धर्मेंद्र गजभियेच्या भावाला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पती-पत्नी आणि त्यांच्यातील वादाची माहिती सांगितली. १६ एप्रिलला डॉक्टरांनी पोलिसांना अहवाल दिला.
त्यात गळा आवळल्याने गजभियेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी निशा आणि तिच्या मुलीला शनिवारी रात्री ताब्यात घेतले.
मुलीची सुधारगृहात रवानगी
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस तिची सुधारगृहात रवानगी करणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी कुणाचा काही रोल आहे का, त्याचीही चाैकशी ठाणेदार कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रंजे करीत आहेत.