मुंबई : ज्या रझा अकादमीने आझाद मैदानावरच्या अमर जवान स्तंभाची मोडतोड केली, महिला पोलिसांवर हात उगारला, कायम भारताविरुद्ध भूमिका घेतल्या. अशा रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते.
त्यांना महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमार्फत ते बोलत होते.
या ‘रझा अकादमी’कडून भिवंडी येथे झालेल्या मोर्चा नंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना मारण्यात आलं होतं. नांदेड, अमरावती, मालेगाव मध्ये दंगल घडवण्यात पुढाकार घेऊन त्यातही पोलिसांवर मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती.
एकीकडे राज्याचे गृहमंत्री रझा अकादमीवर बंदी घालण्याबाबत सभागृहात सांगतात तर दुसरीकडे याच राज्याचे पोलीस अधिकारी रझा अकादमीसोबत इफ्तार पार्टी करत आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना? एवढंच विचारायचं आहे, असे म्हणत त्यांनी मविआ सरकारच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.