नोएडाहून शेअरिंग कॅबमध्ये घरी जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

Crime News

लखनऊ : उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला नोएडाहून फिरोजाबादला जात असताना तिच्यासोबत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

ती महिला रात्री साडेआठ वाजता नोएडाच्या सेक्टर 37 ते फिरोजाबादला जाण्यासाठी शेअरिंग टॅक्सीत बसली होती. यमुना एक्सप्रेस वेवर आल्यानंतर प्रवाशांनी तरुणीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील कुबेरपूर परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास इको कारमधील आरोपींनी मुलीला बळजबरीने एक्स्प्रेस वेच्या बाजूला असलेल्या झुडपात नेले आणि मुलीवर बलात्कार करत राहिले.

मुलगी ओरडत राहिली, रडत राहिली, पण थंडी आणि धुक्यामुळे रात्री तिचा आवाज कोणीच ऐकला नाही. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी महिलेला ऑटोमध्ये बसवले आणि फिरोजाबादला निघून गेले.

मात्र, पीडित तरुणी एतमादपूर येथे ऑटोमधून खाली उतरली आणि सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास थेट पोलीस ठाण्यात गेली आणि तिने आपल्यवर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना सांगितली.

हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर पोलीसही सक्रीय झाले. पोलिसांचे पथक घाईघाईत एक्स्प्रेस वेवर पोहोचले आणि टोल फुटेज काढून घेतले. टोल फुटेजच्या आधारे पोलिसांनी वाहनाची ओळख पटवून ते जप्त केले.

यानंतर पोलिसांनी हा प्रकार करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली. पोलिस आयुक्त डॉ. प्रितिंदर सिंग यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते म्हणाले, आरोपी मुलांची चौकशी सुरू आहे, तपासात जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.