दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीरच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 59.18 कोटी रु. निधी मंजूर

ना.संजय बनसोडे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाला यश

मुंबई : मराठवाड्यातील व जिल्ह्यातील एकमेव असलेल्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामास 59.18 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महाविद्यालयामुळे शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांच्या प्रशिक्षणाकरिता व दुग्ध तंत्रज्ञान संशोधनासाठी या महाविद्यालयचे महत्त्वाचे योगदान आहे.

ही बाब राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जिल्हा लातूर येथे शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सुरू करण्यात आले.

कृषि व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत सदर महाविद्यालय, पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले व सन 2008 पासून आज पर्यंत पशुवैद्यक महाविद्यालय परिसरातील तात्पुरत्या बांधकामात चालू आहे.

महाविद्यालयाचे शिक्षण, विस्तार व संशोधन चे उद्दिष्ट पूर्तता करताना अपुरे व तात्पुरत्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये ही मोठी अडचण ठरत होती.

जिल्ह्यातील व मराठवाड्यातील हे एकमेव महाविद्यालय असल्याने शेतकरी, दुग्ध व्यावसायिकांच्या प्रशिक्षणाकरिता व दुग्ध तंत्रज्ञान संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाचे महत्त्व व योगदानाची बाब नामदार संजय बनसोडे यांच्या लक्षात आली व गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी रू.59.18 कोटी मंजूर करण्यास्तव शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला.

सदरील कामाच्या मान्यतेसाठी मा. ना. सुनीलजी केदार साहेब, मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य तसेच मा.ना.अमितजी देशमुख साहेब, मंत्री, वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर कुलगुरू, मपमविवि, नागपूर यांनी मा. ना. सुनीलजी केदार साहेब, मा. ना.संजय बनसोडे साहेब, मा.ना.अमितजी देशमुख साहेब यांनी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम येणाऱ्या आर्थिक वर्षात सुरुवात होत असल्याने दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व अधिकारी/ कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उपरोक्त निधी तथा प्रशासकीय मंजुरीकरिता महाविद्यालय प्रशासनातर्फे ना.संजय बनसोडे, राज्यमंत्री यांचे आभार मानले आहे.