दिवंगत डॉ.शिवाजी पाटील निलंगेकर यांचा साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीला विसर

दिवंगत डॉ.शिवाजी पाटील निलंगेकर यांचा साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीला विसर

उदगीर : 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत असून विविध लेखक, गायक, कवी आणि राजकीय नेत्यांची नावे स्थळाला देण्यात आली आहेत.

मात्र लातूर जिल्ह्याचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाचा मात्र आयोजन समितीला विसर पडला आहे.

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.

उदगीरसारख्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या तालुक्यात हे संमेलन होत असून त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

या संदर्भात अनेक बैठका घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, छत्रपती शाहू महाराज सभामंडप, कलामहर्षी बाबूराव पेंटर कला मेळा, शांताबाई शेळके कविकट्टा, सिकंदर अली सभागृह, डॉ.एन.वाय. डोळे, हुतात्मा भाई शामलाजी व्यासपीठ, संग्रामआप्पा शेटकर, देवीसिंग चौहान, लोकनेते कै.विलासराव देशमुख सभागृह, त्र्यंबकदासजी झंवर, आदी साहित्यिक, कलाकार, राजकीय नेते यांची नावे दिली आहेत.

मात्र लातूर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव कुठेही घेतले नाही. याबाबत निलंगा येथील नागरिकांमध्ये संताप आहे.

सभागृहाच्या प्रवेशद्वारावर कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने या साहित्य संमेलनाच्या समितीचे स्वागताध्यक्ष व संयोजक डॉ.निलंगेकरांना विसरले का? अशी चर्चा सध्या रंगत आहे.

विशेष म्हणजे दहा वेळा आमदार, एकदा मुख्यमंत्री, अनेक वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्राचे मोठे नेतृत्व केले. राजकारणात संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. निलंगेकर साहित्यातही मागे नव्हते.

1) डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, 2) निष्ठावंत नेतृत्व : डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, 3) वैभव तेरणेचे : डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, 4) महाराष्ट्राचे लोकनेते : डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जीवनावर प्रकाशित झाले आहे.

त्यामुळे साहित्यातही अग्रेसर असणारे निलंगेकर आज पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या अनेक आठवणी महाराष्ट्राला आहेत.

मात्र, या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचे नाव निश्चितच विसरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.